Detection Story : एक कार चोरीचा तपास, १५० किलोमीटरचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, वेषांतर करून चोरट्याला पकडले
महा पोलीस न्यूज ।चेतन वाणी । जळगाव शहरातील अयोध्यानगर, एमआयडीसी येथुन घरासमोर पार्क केलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होताच पोलीस कामाला लागले. १५० किलोमीटर अंतराचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर पोलीस संभाजीनगरला पोहोचले. आरोपी निश्चित होताच ४ दिवस वेषांतर करून पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अयोध्या नगर जुनी वसाहत एमआयडीसी येथे राहणारे दिपक जगदीश खडके यांनी स्वतःच्या मालकीची सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्वीप्ट डिझायर कार क्रमांक एमएच.०२.सीडब्लू.०९०६ ही दि.३ रोजी रात्री १.३० वाजेच्या सुमारास घराच्या गेट समोर पार्क केली होती. सकाळी ७ वाजता दिपक खडके झोपेतून उठून घराबाहेर आले असता त्यांना त्यांची कार घरासमोर दिसून आली नाही. त्यांनी कारचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु कार बाबत काही एक माहिती मिळून न आल्याने व कार चोरी झाल्याबाबत खात्री झाल्याने दिपक खडके यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
१५० कि.मी. रोडचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दोन टिम तयार करुन पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेजवर काम करणारे कर्मचारी राहुल रगडे, विशाल कोळी व राहुल घेटे अशांची टिम तयार करुन चोरी झालेल्या कारबाबत शोध घेण्याचे आदेश दिले होते. तिघांनी सलग १५० कि.मी. रोडचे फुटेज चेक करत व तांत्रीक पद्धतीने कार चोर हे ही संभाजी नगर दिशेने गेलेबाबत खात्री केली.
मुख्य सूत्रधार शोधला, वेषांतर करून पकडले
संपुर्ण महाराष्टात चार चाकी वाहन चोरी करणे करीता प्रसिध्द असलेला आरोपी नामे दारुद शेख मंजुर शेख रा.धाड जि.बुलढाणा यानेच ही कार चोरी केले असल्याबाबत माहिती मिळवली. पथक सलग चार दिवस संभाजी नगर येथे वेषांतर करुन आरोपी राहत असलेल्या परिसरातच आरोपीताचा शोध घेत राहिले. अखेर गोपनीय बातमीद्वारे व तांत्रीक पध्दतीने आरोपीचा शोध लागल्याने आरोपी दारुद शेख मंजुर शेख याला एमआयडीसी पोलीसांनी त्याचे राहते घर सुंदरवाडी, संभाजी नगर येथून शिताफतीने ताब्यात घेतले.
चोरीची दुसरी कार हस्तगत
आरोपीकडे जळगाव येथे कार चोरी करण्यासाठी सोबत आणलेली पांढ-या रंगाची स्पीप्ट डीझायर एमएच.१५.जी.४८८७ ही कार त्याचेकडे मिळून आली. सदरची कार आरोपी याने परभणी जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली. परभणी येथे संपर्क करुन कार बाबत माहिती घेतली असता कार चोरी झाले बाबत नानलपेठ पोलीस स्टेशन परभणी येथे गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती मिळुन आली आहे. परभणी येथुन चोरी केलेल्या कारसह आरोपीतास ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. पथक अयोध्यानगर येथून चोरी केलेल्या कारबाबत आरोपीची चौकशी करीत आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, हवालदार दत्तात्रय बडगुजर, राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल घेटे, किशोर पाटील, विकास सातदिवे यांनी केली आहे.