Crime

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद

नकली नोटा आणण्यापूर्वीच एलसीबीकडून तिघे जेरबंद

३६ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जप्त; पाच दिवसांची  कोठडी

जळगाव महापोलीस न्यूज l – शहरात नकली नोटा चलनात आणण्याच्या तयारीत असलेल्या तिघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार केले आहे. ही कारवाई २७ जून रोजी रात्री आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांकडून ३६ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे सचिन दरबारसिंग राजपूत (३४, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव), सचिन संजय गोसावी (२३, मूळ रा. टिटवी, ता. पारोळा, सध्या रा. वाघनगर) आणि विजय प्रभुलाल माहोरे (३८, रा. अटलगव्हाण, ता. पाचोरा) हे तिघे असून, त्यांच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी विजय पाटील यांना नकली नोटा चलनात आणण्यासाठी दोन तरुण जिल्हा रुग्णालय परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ. अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील व रविंद्र कापडणे यांच्या पथकाने तत्काळ सापळा रचून परिसरात गस्त सुरू केली.

थोड्याच वेळात एमएच १९ डीयू ७८०८ क्रमांकाच्या वाहनावर दोन तरुण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे निदर्शनास आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांची ओळख सचिन राजपूत आणि सचिन गोसावी अशी झाली. त्यांच्या अंगझडतीत ३६ हजार ५०० रुपयांच्या नकली नोटा सापडल्या. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांची चौकशी उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांनी केली असता, या नोटा विजय प्रभुलाल माहोरे याच्याकडून घेतल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी माहोरेलाही अटक केली असून, तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी देखील जिल्हापेठ पोलिसांनी अशाच प्रकारचे नकली नोटांचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यावेळी नोटा छपाईपासून ते वितरकांपर्यंत संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्याचे धागेदोरे मध्यप्रदेशपर्यंत गेले होते. सद्य परिस्थितीतही हे प्रकरण केवळ तिघांपुरते मर्यादित नसून, यामागील संपूर्ण जाळे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button