
सेवा संकल्प अभियानांतर्गत एस. एस. एम. एम. महाविद्यालयात शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन
पाचोरा येथे विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण, बार्टी व जात पडताळणी योजनांची माहिती*
जळगाव, सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत एस. एस. एम. एम. महाविद्यालय, पाचोरा येथे विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभाग, बार्टी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या विविध शैक्षणिक योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले होते, तर उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. समाजकल्याण तथा बार्टीचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वाधार योजना, वसतिगृह प्रवेश, जात प्रमाणपत्र पडताळणी तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध प्रशिक्षण व मार्गदर्शनाच्या संधींबाबत माहिती दिली.
एकही विद्यार्थी शासकीय योजनांच्या माहितीपासून वंचित राहू नये, यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच गाव-वस्तीपर्यंत वर्षभर जनजागृती करण्यात येणार असल्याचे अनिल पगारे यांनी सांगितले. प्रकल्प अधिकारी अर्जुन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. श्रावण तडवी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेश वळवी यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. शारदा शिरोळे यांनी मानले.






