Social

जळगाव जनता सहकारी बँकेकडून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

जळगाव जनता सहकारी बँकेकडून सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर

बँकेच्या व्यवसायात २७६ कोटींची वाढ; ठेवी २,४३६ कोटींवर, नेट एनपीए शून्य

जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांसाठी १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे नाट्य संकुल येथे रविवारी झालेल्या सभेत बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी ही घोषणा केली. यावेळी बँकेच्या एकूण व्यवसायात २७५.९६ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सतीश मदाने होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष नितीन झवर, संचालक मंडळाचे सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सभेची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. त्यानंतर दिवंगत सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन झवर तसेच नवनियुक्त संचालक जवाहरभाई पटेल आणि डॉ. विलास रेलन यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात सतीश मदाने यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, ३१ मार्च २०२६ अखेर बँकेच्या ठेवींमध्ये १८५.३८ कोटी रुपयांची वाढ होऊन त्या २,४३६.२८ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. कर्जवाटपात ९०.५८ कोटी रुपयांची वाढ झाली असून एकूण कर्जरक्कम १,४४९.३९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्च २०२५ च्या तुलनेत बँकेच्या एकत्रित व्यवसायात २७५.९६ कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

बँकेच्या आर्थिक शिस्तीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ग्रॉस एनपीए केवळ ३.३५ टक्क्यांवर राखण्यात यश आले असून नेट एनपीए शून्य टक्के ठेवण्यात बँकेला यश मिळाले आहे. ही बँकेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपाध्यक्ष नितीन झवर यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे बँकेची प्रगती, विविध योजना आणि डिजिटल बँकिंगमधील वाटचाल उलगडून सांगितली. हाताने लिहिल्या जाणाऱ्या किर्द, पासबुक आणि खतावणीपासून सुरू झालेला प्रवास आज इंटरनेट बँकिंगसह आधुनिक डिजिटल सेवांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. बँकेने सुरू केलेल्या इंटरनेट बँकिंग सेवेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबविण्यात येणारी ‘दुग्धसंपदा’ योजना, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत बचतगट विभाग तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली ‘बालमित्र बचत खाते’ योजना यांची माहितीही यावेळी देण्यात आली. सध्या ३,६०० बचतगटांद्वारे सुमारे ६० हजार महिलांपर्यंत बँकेच्या सेवा पोहोचल्या आहेत.
बँक सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असून भविष्यात इतर राज्यांमध्ये शाखाविस्तार करण्याचे नियोजन आहे.

विद्यार्थ्यांसाठी दोन अभ्यासिका सुरू

करण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सतीश मदाने यांनी दिली. सायबर फसवणुकीचे वाढते धोके लक्षात घेऊन ग्राहकांसाठी डिजिटल साक्षरता अभियान राबविले जात असून ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या सुरक्षित बँकिंग व्यवहार करता यावेत यासाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचाही बँकेचा मानस आहे.

सभेतील सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे समाधानकारक निराकरण करण्यात आले.

जळगाव जनता सहकारी बँक ही छोट्या लोकांची मोठी बँक आहे. सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. आगामी काळात विस्तार आणि डिजिटल सेवांवर अधिक भर दिला जाईल.”
— सतीश मदाने, अध्यक्ष, जळगाव जनता सहकारी बँक

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button