यावल नगरपालिका निवडणूक : उबाठाच्या छाया पाटील यांचा दणदणीत विजय

यावल नगरपालिका निवडणूक : उबाठाच्या छाया पाटील यांचा दणदणीत विजय
भाजपाचा दारुण पराभव
यावल ( प्रतिनिधी) : यावल नगरपालिकेच्या चुरशीच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपाला स्पष्ट नाकारत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान केले. भाजपाच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांचा तब्बल पाच हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला.
आमदार अमोल जावळे यांचा प्रभावही या निवडणुकीत फिका पडल्याचे निकालातून समोर आले. नगराध्यक्ष झालेल्या छाया पाटील यांचे पती अतुल पाटील यांचाही प्रभाग ११ मध्ये अवघ्या २०० मतांनी पराभव झाला. या प्रभागातून हेमराज फेगडे विजयी ठरले. “एक अकेला सै. पे भारी” अशी स्थिती छाया पाटील यांची झाली असून, त्यांच्या वैयक्तिक ताकदीने भाजपाला धक्का दिला आहे.
२ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते, मात्र विविध कारणांमुळे मतमोजणीला १९ दिवस उशीर झाला. रविवारी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या देखरेखीखाली मतमोजणी शांततेत पूर्ण झाली.
निकालानुसार, उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांना १४,०५० मते मिळाली, तर भाजपाच्या रोहिणी फेगडे यांना पाच हजारांहून अधिक मते कमी पडली. या मोठ्या मताधिक्याने छाया पाटील यांचा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
विजय जाहीर होताच मतमोजणी केंद्राबाहेर शेकडो समर्थकांनी जल्लोष साजरा केला. ढोल-ताशे, फटाके आणि घोषणाबाजीने शहर दुमदुमले. उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली.
या विजयामुळे यावलच्या राजकीय समीकरणात मोठा बदल घडला आहे. भाजपाला जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले असून, शहराच्या विकासाला नवीन दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून छाया पाटील यांच्यावर शहराच्या प्रगतीची मोठी जबाबदारी आहे.






