Special

एकनाथ खडसेंचा माईंड गेम राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्हे भाजपच्या हिताचा!

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात चांगलीच राजकीय रंगत आली आहे. भाजपचे दोन्ही उमेदवार जाहीर झाले असले तरी मविआचे मात्र अद्याप ठरलेले नाही. आपण राजकीय संन्यास घ्यायचा असा निश्चय करीत रावेर लोकसभा मतदार संघासाठी आ.एकनाथराव खडसेंनी माईंड गेम खेळला. आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगत त्यांनी सून खा.रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यास भाजपला भाग पाडले. सुनेची उमेदवारी निश्चीत होताच स्वतः निवडणुकीच्या रिंगणातून काढता पाया घेतला, इतकंच नव्हे तर मुलगी रोहिणी खडसेंना देखील जमणार नसल्याचे उत्तर दिले. मविआकडून माजी आ.संतोष चौधरी आणि रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव समोर येताच दगडापेक्षा वीट मऊ म्हणून खडसेंनी रविंद्र पाटलांच्या नावाला पाठिंबा दिला. रावेरच्या मैदानात रविंद्र पाटील विरुद्ध रक्षा खडसे सामना रंगला तर तो भाजपच्या हिताचा ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नुकसानच होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात सध्या महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी चुरस वाढली आहे. जळगावातून भाजपकडून विद्यमान खा.उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करून माजी आ.स्मिता वाघ यांना तर रावेर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खा.रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगावातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण पवार यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

एकनाथराव खडसेंनी खेळला डाव
राज्याचे माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या अडचणी गेल्या काही वर्षापासून कमी होत नव्हत्या. भोसरी प्रकरण, ईडी चौकशी, गौण खनिज प्रकरण अशा चौकशी सुरु होत्या. त्यातच प्रकृती साथ देत नव्हती. काही महिन्यांपूर्वीच खडसेंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. एकंदरीत सर्व बाबी लक्षात घेता खडसेंनी सावध डाव खेळला. सून रक्षा आणि मुलगी रोहिणी यांच्या भविष्याच्या दृष्टीने खडसेंनी भाजपवरील टीका टाळली. भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीत देखील फारशी टीका न करता आपण स्वतः उमेदवारी लढणार असल्याचे जाहीर केले होते. एकनाथ खडसेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर करणे म्हणजे तो त्यांचा पहिला डाव होता.

रक्षा खडसेंना उमेदवारी आणि खडसे बॅकफूटवर
एकनाथराव खडसे उमेदवार राहणार असल्याची चर्चा रंगल्याने भाजपकडून त्यांच्या विरोधात सून विद्यमान खा.रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. रक्षा खडसेंची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रकृतीचे कारण देत खडसेंनी नकार दिला. बारामतीच्या धर्तीवर रोहिणी खडसेंचे नाव पुढे येत होते मात्र तयारी नाही आणि महिला प्रदेशाध्यक्ष पद असल्याचे सांगत खडसेंनी ती शक्यता पण खोडून काढली. खडसेंच्या नकाराने रावेरमध्ये खडसे विरुद्ध खडसे सामना रंगणार नाही हे जवळपास स्पष्ट झाले.

एकनाथराव खडसे भाजपच्या वाटेवर?
राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगत आहेत. काही दिवसापूर्वी तर खडसेंनी स्वतः याबाबत उच्चार करीत मी पवार साहेबांना सांगून भाजपत जाईल असे म्हटले होते. मध्यंतरी चर्चा थंडावली होती मात्र आता पुन्हा ती चर्चा सुरू झाली आहे. खडसेंच्या दिल्लीवारी मागे भाजप प्रवेशाचा मुहूर्त असल्याचे बोलले जात आहे. खडसेंनी भाजपात प्रवेश केल्यास रावेर लोकसभा मतदार संघात भाजपला मोठे बळ मिळणार आहे.

महाविकास आघाडी उभे करणार तगडे आव्हान
रावेर लोकसभा मतदार संघाची जागा महविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या वाट्याला आली आहे. शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, माजी आ.संतोष चौधरी आणि उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील आणि माजी आ.संतोष चौधरी हे पक्षाशी एकनिष्ठ असल्याने त्यांच्या उमेदवारीवर पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. श्रीराम पाटील हे अजित पवार गट ते भाजप व्हाया शरद पवार गट असा त्यांचा प्रवास असल्याने काहीशी नाराजी आहे. रावेरमध्ये मराठा कार्ड खेळल्यास रविंद्र पाटील यांना आणि अल्पसंख्याक कार्ड खेळल्यास संतोष चौधरी यांना पसंती दिली जाणार आहे.

खडसेंना आव्हान देण्यास चौधरी ठरणार वरचढ
एकनाथराव खडसे हे एका आठवड्यात पुन्हा घरवापासी करणार असल्याची चर्चा आहे. खुद्द खडसेंनी याबाबत सूतोवाच केले आहेत. जर एकनाथराव खडसे पुन्हा भाजपात गेल्यास त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संतोष चौधरी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. संतोष चौधरी आणि एकनाथराव खडसे यांच्यात अनेक वर्षापासून मनभेद असल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते दमाने कामाला लागतील आणि त्यामुळे निवडणूक दमदार होईल यात शंका नाही.

पवार गटाचा उमेदवार उशिरा जाहीर होणार
रावेर लोकसभा मतदार संघातून एकनाथराव खडसे यांच्या भाजप प्रवेशाचे चित्र अद्याप स्पष्ट नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपले उमेदवार उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात १० तारखेला उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून त्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल. एकनाथराव खडसेंनी भाजप प्रवेश केल्यास रावेरमधून त्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button