एलसीबी पोलिसांनी सापळा रचत भुसावळमध्ये पकडला सुरतचा कुख्यात गुन्हेगार
जबरी चोरीसह गंभीर गुन्ह्यात होता फरार

जळगाव | प्रतिनिधी: गुजरातमधील सुरत येथील कुख्यात गुन्हेगार साहील उर्फ सलीम पठान (वय २१, रा. भाटीया गाव, हाजीपुरा, सचिन, जि. सुरत) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अखेर जेरबंद केले.
तापी व्यारा येथील सेशन कोर्टातील जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११:१५ वाजता नहाटा चौफुलीजवळील हायवेवर सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले.
निझर पोलीस स्टेशन, सुरत येथून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई पार पडली. साहील पठान हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरी, घरफोडी, चोरी आणि आर्म अॅक्टसह एकूण आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
उमरा, सचिन, माहीरापुरा, पुना, कडोदरा आणि नवसारी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी साहीलला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी निझर पोलीस स्टेशन (गुजरात) येथील सफौ/ए. बी. पटेल यांच्या ताब्यात दिले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरिक्षक शरद बागल, रवि नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या यशस्वी कारवाईमुळे जळगाव पोलिसांचे कौतुक होत असून, गुन्हेगारीविरुद्ध त्यांच्या सतर्कतेचे आणि कार्यक्षमतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.






