गणेश विसर्जनादरम्यान गिरणा नदीमध्ये ममुराबादच्या गणेशचा बुडून मृत्यू !

गणेश विसर्जनादरम्यान गिरणा नदीमध्ये ममुराबादच्या गणेशचा बुडून मृत्यू !
नव्या गिरणा नदीच्या पुलाखाली घडली घटना ; शोधकार्य युद्धपातळीवर सुरु
जळगाव;- जळगावातील ममुराबाद येथील गणेश गंगाराम कोळी (वय २७) या तरुणाचा गणेश विसर्जनादरम्यान गिरणा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (६ सप्टेंबर २०२५) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाळधी-तरसोद दरम्यान नव्याने बांधलेल्या गिरणा नदीच्या पुलाखाली घडली. गणेशोत्सवाच्या आनंदावर या घटनेमुळे ममुराबाद गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
गणेश कोळी आपल्या आई-वडील आणि बहिणीसह घरगुती गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गिरणा नदीवर गेला होता. विसर्जनादरम्यान तो मूर्ती घेऊन नदीच्या पाण्यात उतरला. मात्र, नदीतील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि बुडाला. त्याच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्याला वाचवणे शक्य झाले नाही.
घटनेची माहिती मिळताच गणेशचे नातेवाईक, मित्र आणि जळगाव तालुका पोलिसांनी तात्काळ शोधकार्य सुरू केले. तथापि, गिरणा धरणातून ९,७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने शोधकार्यात मोठ्या अडचणी आल्या. रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले. रविवारी (७ सप्टेंबर २०२५) सकाळपासून पुन्हा आव्हाणे, खेडी, वडनगरी, फुपनगरी आणि कानळदा गावाजवळील नदीकाठावर शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासन यांच्यासह ग्रामस्थही या शोधकार्यात सहभागी झाले आहेत.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गिरणा धरण ९६ टक्के भरले असून, धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या ९,७६८ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गणेश विसर्जनासाठी नदीपात्रात उतरण्यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे






