जिल्हा हादरला : महिलेवर सामुहिक अत्याचार, १४ आरोपींना अटक
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचाही शोध सुरू : जळगाव पोलिसांची तत्काळ कारवाई

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अत्यंत गंभीर सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण १५ आरोपींपैकी १४ मुख्य व सह-आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असली तरी सध्या परिस्थिती पूर्णपणे शांततेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ जून २०२६ रोजी देऊळगाव-कापूसवाडी रोडवरील ठांबरडा नाला परिसरातील निर्जन जंगलात ४० वर्षीय पीडित महिला तिच्या परिचयातील मित्र रोषण गुलशेर तडवी यांच्यासोबत बसलेली होती. त्यावेळी सुमारे १५ तरुण तेथे आले. त्यांनी दोघांना धमकावत पीडितेला जबरदस्तीने ताब्यात घेतले.
या घटनेदरम्यान युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या अमानुष कृत्यावेळी इतर काही सह-आरोपींनी आपल्या मोबाईल फोनवर संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले. त्यानंतर त्यातील एका संशयित आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले.
घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१) (सामूहिक बलात्कार), कलम ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ व ६७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस तपासादरम्यान आतापर्यंत १५ पैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्यामागील उद्देश, त्याचा प्रसार आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, या गंभीर गुन्ह्यात तातडीने कारवाई करून बहुसंख्य आरोपींना अटक करण्यात आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या संपूर्ण परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.






