भुसावळ : कुख्यात गुन्हेगाराची हत्या, मृतदेह पुरून टाकल्याने खळब

भुसावळ : कुख्यात गुन्हेगाराची हत्या, मृतदेह पुरून टाकल्याने खळबळ
भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील कुख्यात गुन्हेगार मुकेश भालेराव याचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह पुरून टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
मुकेश भालेराव (वय ३१, रा. टेक्निकल हायस्कूल मागे, भुसावळ) याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, लूट, धमकी आणि खंडणीसह तब्बल २६ गुन्हे दाखल होते. प्रशासनाने यापूर्वी त्याला नाशिक येथे स्थानबद्ध केले होते. मात्र, बाहेर आल्यानंतर तो पुन्हा भुसावळमध्ये वास्तव्यास होता.
चार दिवसांपासून बेपत्ता, पत्नीने दिली तक्रार
चार दिवसांपूर्वी काही तरुण त्याला घरातून घेऊन गेले होते, त्यानंतर तो बेपत्ता झाला. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही सापडला नाही. अखेर, शुक्रवारी सकाळी त्याच्या पत्नीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तापी नदीच्या किनारी मृतदेह सापडला
आज (२१ मार्च) सायंकाळी सातच्या सुमारास तापी नदीच्या किनारी एक मृतदेह पुरलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे.
हत्या कोणी आणि का केली?
मुकेश भालेराव आणि त्याच्या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक गतीमान करण्यात आला आहे.