एकनाथराव खडसेंच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात डल्ला, चोरट्यांची दहशत वाढली

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात चोरट्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या ‘मुक्ताई’ निवासस्थानात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रसंगामुळे शहरभर खळबळ माजली असून, राजकीय व्यक्तींच्या घरांनाही सुरक्षेची हमी नसल्याचे उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरामनगर परिसरातील ‘मुक्ताई’ बंगल्यात हा प्रकार घडला. एकनाथराव खडसे हे प्रामुख्याने मुक्ताईनगर येथे राहत असल्याने दिवाळीनिमित्त ते गावी गेले होते. त्यामुळे जळगावातील हे घर बंद होते. मंगळवारी सकाळी त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे बंगल्यावर पोहोचले तेव्हा मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप मोडलेले दिसले. घरात पाहणी केली असता, घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या, ज्यावरून चोरीची खात्री पटली.
ही बाब लगेच त्यांनी लागलीच एकनाथराव खडसे यांना कळवली गेली. त्यांनी त्वरित पोलिसांना सूचना दिल्या आणि घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला. सध्या पंचनामा आणि चौकशीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग तपासण्यास प्रारंभ केला असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चोरीत नेमके किती नुकसान झाले आणि कोणत्या वस्तू लंपास झाल्या, याबाबतची नेमकी आकडेवारी पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल. तरीही, एका प्रमुख राजकीय नेत्याच्या घरात अशी चोरी घडणे हे जळगावच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.






