जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत ६ वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळगाव: शहरातील मेहरूण भागात ममता हॉस्पिटलजवळ भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात रिक्षाने धडक दिल्याने ६ वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातानंतर रुग्णालयात मुलीच्या आईने केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मृत बालिकेचे नाव मनीषा जयसिंग बारेला (वय ६, रा. नागलवाडी, ता. चोपडा, हल्ली मु. मेहरूण) असे आहे. मनीषाची आई स्थानिक ठेकेदार अहमद खान यांच्याकडे बांधकाम मजूर म्हणून काम करते, तर मनीषा मेहरूण येथील एका मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती.
मंगळवारी दुपारी तिची आई कामावर असताना, मनीषा बाजूलाच खेळत होती. अचानक ती रस्त्याच्या बाजूला गेली असता, भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत मनीषाच्या तोंडाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.
ठेकेदार अहमद खान यांनी तात्काळ नागरिकांच्या मदतीने मनीषाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयात आपल्या एकुलत्या एक मुलीचा मृतदेह पाहून तिच्या आईने केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले.
या दुर्दैवी घटनेने बारेला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी मनीषाच्या वडिलांचेही एका बस अपघातात निधन झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






