Crime
गिरणा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक करणारे डंपर जप्त

महा पोलीस न्यूज । सागर महाजन । भडगाव तालुक्यातील कोठली येथील गिरणा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून चाललेल्या एका डंपरवर महसूल विभागाने रात्री उशिरा कारवाई केली. नंबर नसलेला दहा चाकी डंपर जप्त करून भडगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
ही कारवाई रात्री १२.३० च्या सुमारास तहसीलदार शीतल सोलाट यांनी गस्त घालत असताना केली. पथकात त्यांच्यासोबत महसूल सहायक महादू कोळी, कोतवाल अमोल पाटील, भैय्या भोसले, आणि हिरामण पाटील यांचा समावेश होता.
जप्त केलेल्या डंपरवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. गिरणा नदीपात्रातून होणारी वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.






