जळगावात “आय लव्ह मोहम्मद आंदोलन; राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन

जळगावात “आय लव्ह मोहम्मद आंदोलन; राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : देशाच्या संविधानाने सर्व धर्म, जाती व पंथीयांना समान हक्क तसेच धार्मिक स्वातंत्र्य दिले असून प्रत्येकाला आपल्या आवडत्या महापुरुषांचा सन्मान करण्याचा अधिकार आहे. मात्र कानपूर शहरात ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान काही युवकांनी “आय लव्ह यु मोहम्मद ﷺ” असे बॅनर लावले असता तेथील पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केल्याने देशभरातील मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
याविरोधात शुक्रवारी जुमा नमाजेनंतर अहेले सुन्नत वल जमात, शहरे जळगाव यांच्या वतीने भिलपुरा येथील इमाम अहमद रझा चौकात आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधान यांना मागणीपत्र पाठवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य देशवासीयांसमोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान उपस्थित आशिकाने रसूल व गुलामाने मुस्तफा यांनी “आय लव्ह यु मोहम्मद ﷺ” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी सून्नी जामा मस्जिद भिलपुरा येथून इमाम अहमद रझा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सहभागींच्या हाती घोषवाक्य लिहिलेली फलक व बॅनर होते.
या आंदोलनात सून्नी जामा मस्जिद जळगाव व सून्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सैयद अयाज अली नियाज अली, असलम बाबा अशरफी, हाजी बरतर हुसैन, हाजी फारुख तंवर, हाजी शकूर बादशाह, सय्यद उमर, नाझीम पेंटर, शफी ठेकेदार, कामिल खान, मोहम्मद नागोरी, सलमान जाफर यांसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.






