Social

कलियुगातील श्रावण बाळ : आईच्या विचाराला जागला, भाविकांना शेगावी घेऊन गेला!

सुशीला आईंच्या शब्दाला अरविंद देशमुखांनी दिली कृतीची जोड

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्राचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू समर्थक अरविंद देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सुशीला भगवान देशमुख यांचा ८५ वा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात साजरा झाला. आईला दिलेल्या शब्दाचा मान ठेवत अरविंद देशमुख यांनी आपल्या परिसरातील माता-भगिनींना शेगाव दर्शनाची वारी घडवून आणली.

आपल्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त प्रसंगी सुशीला आईंनी अरविंद देशमुख यांना, “सामाजिक व राजकीय कार्य करत असताना अध्यात्माकडे कधीही दुर्लक्ष करू नकोस,” असा एक मोलाचा विचार दिला. आईच्या या शब्दांना मान देत अरविंद देशमुख यांनी तात्काळ शब्द दिला की, आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातील माता-भगिनींना आईच्या रूपात शेगाव श्री गजानन महाराजांची वारी घडवून आणू.

आईला दिलेल्या शब्दाची अंमलबजावणी करत सुशीला आईंच्या सुशील पुत्राने आपल्या परिसरातील माता-भगिनींना शेगाव दर्शनाची वारी घडवून आणली. या भक्तिमय यात्रेमुळे परिसरात आनंद, समाधान आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.

आपल्या मनोगतात अरविंद देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी माता आणि माती या दोघांशीही कधीच प्रतारणा करणार नाही.” त्यांच्या या भावनिक भूमिकेला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात हरिभक्त परायण जळकेकर महाराज यांनी आपल्या प्रवचनातून देव, देश, धर्म, माता आणि माती यांचा सुंदर समन्वय साधत उपस्थित भगिनींच्या डोळ्यात अश्रू आणले. त्यांच्या ओघवत्या आणि हृदयस्पर्शी वाणीने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.

शेगाव वारीहून परतताना वाहनात बसत असताना उपस्थित महिलांनी अरविंद देशमुख यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत, “तू खरंच एक आदर्श मुलगा आहेस,” असे म्हणत मनापासून आशीर्वाद दिले. हा क्षण उपस्थित सर्वांसाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरला.

आईच्या विचारातून जन्मलेली ही शेगाव वारी सामाजिक, धार्मिक आणि संस्कारांची जाणीव करून देणारी ठरली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारा हा उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button