जळगावात २ कोटी ३० लाखांच्या संशोधन प्रकल्पाला मंजुरी

महा पोलीस न्यूज । दि.१९ जुलै २०२५ । नुशोधन राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (ANRF) अंतर्गत “अ मल्टीयुनिर्व्हसिटी अलायन्स ऑन हेल्थ अँड एनर्जी थ्रू इंजिनिअर्ड बायोमोलक्युलर सिस्टीम्स” या प्रकल्पासाठी २.३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER), पुणे येथील डॉ. होमी भाभा रोडवरून प्रा. होथा श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव हे राष्ट्रीय राज्यविद्यापीठ रॅकिंगमध्ये १०० च्या आत पोहोचल्यामुळे या प्रकल्पासाठी पात्र ठरले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखालील सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले आहे. हा प्रकल्प “सहभागीदार (PAIR) योजना” अंतर्गत वर्ग ब मध्ये समाविष्ट करण्यात आला असून, एक वर्षासाठी निधी मंजूर झाला आहे. हा निधी ग्रांट-इन-एड जनरल (Recurring head) अंतर्गत आहे.
सहभागी संस्था – या प्रकल्पात सहा संस्था सहभागी आहेत:
इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अवंतीपोरा – डॉ. आबिद हुसेन शाल्ला
मणिपूर युनिव्हर्सिटी, इंफाळ – डॉ. राजू लैशराम
मोहनलाल सुखाडिया युनिव्हर्सिटी, उदयपूर – डॉ. सिध्दार्थ शर्मा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – प्रा. दिपक शरद दलाल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे – प्रा. राजू गच्चे
काश्मीर युनिव्हर्सिटी, श्रीनगर – प्रा. अजीज ए. दार
प्रकल्पाचे उद्दिष्टे
हा प्रकल्प संशोधन पायाभूत सुविधा, सहयोगी प्रकल्प आणि शैक्षणिक देवाणघेवाणीला बळकटी देणार आहे. यामध्ये चार कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांना IISER, पुणे येथे संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.






