
महा पोलीस न्यूज । दि.९ डिसेंबर २०२५ । जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी २०२५-२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताच शहरातील ‘बोगस मतदारांचा’ मुद्दा चांगलाच तापला आहे. या संदर्भात आता प्रभाग क्रमांक ५ मधील बोगस मतदारांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते ॲड.पियुष पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून रिट पिटीशन दाखल केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्र. ५ आणि ५८०० बोगस मतदारांचा दावा
शहरातील प्रभाग क्रमांक ५ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. ॲड. पियुष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रभागात तब्बल ५,८०० बोगस किंवा दुबार मतदार आहेत. विशेष म्हणजे, या प्रभागाचा ४० टक्के भाग हा व्यापारी (Commercial) स्वरूपाचा असताना, रहिवासी मतदारांची संख्या इतकी प्रचंड कशी असू शकते, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक हरकती याच प्रभागातून घेण्यात आल्या आहेत.
वडिलांचा वसा आणि २०१३ च्या निकालाचा आधार
जळगावचे दिवंगत नगरसेवक आणि ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून ओळखले जाणारे स्व.नरेंद्र अण्णा पाटील यांनी २०१३ मध्ये बोगस मतदारांविरोधात उच्च न्यायालयात लढा दिला होता. त्यावेळी न्यायालयाने संशयित मतदारांचे ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ करण्याचे आणि मतदानावेळी ४ पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी शहरात ६६,७३३ आणि तत्कालीन प्रभाग २० (सध्याचा प्रभाग ५) मध्ये ३,८०० बोगस मतदार चिन्हांकित झाले होते. केवळ ६ मतदार वगळता इतर कुणालाही रहिवासी पुरावा देता आला नव्हता. आजही त्याच पद्धतीने, जुन्या आदेशांचे पालन न करता आणि पडताळणी न करता याद्या प्रसिद्ध केल्या जात असल्याने, ॲड. पियुष पाटील यांनी आपल्या वडिलांच्या लढ्याचा संदर्भ घेत पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
निवडणूक आयुक्त आणि मनपा प्रशासन प्रतिवादी
बोगस मतदारांबाबत वारंवार पुराव्यानिशी तक्रारी करूनही जळगावचे निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त आणि उपायुक्त यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेवर संशय व्यक्त करत, ॲड. पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत संबंधित निवडणूक अधिकारी आणि मनपा प्रशासनाला ‘पार्टी’ (प्रतिवादी) केले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे.
सर्वेक्षणात अडथळा आणल्याचा आरोप
प्रभाग ५ मध्ये बोगस मतदारांचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या मनपाच्या अभियंत्यांना आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून हाकलून लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सत्तेचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याची तक्रार पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. स्व.नरेंद्र अण्णा पाटलांनी ज्याप्रमाणे अन्यायाविरुद्ध न्यायालयीन लढा दिला होता, त्याच धर्तीवर त्यांचे पुत्र ॲड.पियुष पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेला आणि विरोधकांना न्यायालयात खेचले आहे. आता उच्च न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे संपूर्ण जळगाव शहराचे लक्ष लागले आहे.






