
मुद्देमाल सुपूर्दगीतून पोलिसांनी जिंकला नागरिकांचा विश्वास”– पालकमंत्री गुलाबराव पाटील
चोरीस गेलेला मुद्देमाल मूळ मालकांना सुपूर्द ;नागरिकांनी व्यक्त केले समाधान
जळगाव – : चोरीस गेलेला मुद्देमाल शोधून तो मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून जनतेच्या कष्टाच्या कमाईचा सन्मान करणारी आणि पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमे’ अंतर्गत चोरीस गेलेल्या मोटारसायकली, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर मौल्यवान वस्तू संबंधित मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थांनी पालकमंत्री होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आ सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप गावित, चाळीसगाव चे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपाधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, चोरीला गेलेल्या वस्तू या केवळ मालमत्ता नसून त्या एखाद्या कुटुंबाच्या कष्टाची कमाई आणि भावनिक जिव्हाळ्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे अशा वस्तूंचा शोध घेऊन त्या मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही पोलिस दलाची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. नागरिकांना त्यांचा हक्काचा मुद्देमाल परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या मोहिमेचे खरे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या तपास कार्याचे कौतुक करताना गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच मुद्देमालाची तातडीने परतफेड करण्यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांनीही सतर्क राहून अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, मौल्यवान वस्तूंची योग्य नोंद व सुरक्षितता राखावी तसेच कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. “गुन्हेगारीविरुद्धची लढाई ही केवळ पोलिसांची नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले, पोलीस विभाग हा शासनाचा महत्त्वपूर्ण विभाग असून हा विभाग पूर्वीपेक्षा आता अधिक गतिमान व आधुनिक झाला आहे. शासन पोलीस विभागास नेहमी मदत करत असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सध्याच्या काळात पोलिसांची जबाबदारी वाढली असून पोलीस व जनता यांच्यातील संबंध मित्रत्वाचे असले पाहिजे या दृष्टीने त्यांनी काम करावे. आजच्या कार्यक्रम हा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा कामाप्रती उत्साह वाढविणारा असून त्यांनी पुढील काळात सुद्धा असेच उत्कृष्ट काम करावे अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी सर्व उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचारी यांना दिल्या.
आमदार सुरेश भोळे यावेळी आपल्या मनोगत म्हणाले, आजच्या” मुद्देमाल सुपूर्दगी मोहीम ” या कार्यक्रमा द्वारे नागरिकांना त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल शोधून मूळ मालकास परत मिळू शकतो, असा चांगला विश्वास पोलीस विभागाच्या प्रति नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. पोलीस विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी यांच्या चांगल्या कामाची नोंद घेऊन पोलीस विभागाने आज त्यांचा सन्मान केल्यामुळे त्यांचे मनोबल व कामाप्रती विश्वास अधिक दृढ झाला आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी जळगाव परिमंडळ, चाळीसगाव परिमंडळ व जळगाव जिल्हा सायबर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातुन एकूण 2 कोटी 16 लाख 84 हजार 930 रूपयांचा किमतीचा मुद्देमाल संबंधित फिर्यांदीना मान्यवराच्या हस्ते परत करण्यात आला. यामध्ये चारचाकी वाहन, मोटार सायकल, रोख रक्कम, मोबाईल फोन, सोने, चांदिचे मौल्यवान दागिने यावस्तुचा समावेश आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पोलीस विभागात उत्कृष्ट पद्धतीने काम केलेल्या अधिकारी,कर्मचारी, आणि विधी व न्याय विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस पाटील, पोलीस तपासात सहकार्य करणारे व्यक्ती यांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आपल्या प्रास्तिकात कार्यक्रम आयोजनाचा उद्देश विशद केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार अमित माळी यांनी केले तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री. गावित यांनी आभार व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते जिल्हा क्रीडा मैदान शुभारंभ–
जळगाव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा मैदानामधील नूतनीकरनाचे काम पूर्ण झाले असून आता खेळाडूंनां वापरसाठी हे मैदान खुले करण्याच्या कामाचा शुभारंभ आज पालकमंत्री गुलाबराव पाटील,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, नगरसेवक तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
जिल्हा क्रीडा संकुल येथील नुतनीकरण कामे –
क्रीडा संकुल मध्ये बहुद्देशीय हॉल मध्ये कोटा फरशी त्यावर सिंथेटिक टेरा फ्लेक्सचे बॅडमिंटन कोर्ट,
तसेच मैदानावर ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक तयार करून त्याच्या आतील मैदानावर लॉन लावण्यात आले आहे.
तसेच मैदानावर आणि मैदानाच्या गेटवर पिण्याच्या पाण्यासाठी आरो सिस्टीम बसविण्यात आली आहे. संपूर्ण मैदानावर गॅलरीसह रंगकाम करण्यात आले आहे.






