जामनेरच्या शेंगोळा यात्रेत मनोरंजन की गुन्हेगारीचे अड्डा?
पोलीस बंदोबस्तातच खुलेआम जुगार-दारू-हुल्लडबाजी : एकीकडे अधिवेशन, दुसरीकडे कायद्याचे धिंडवडे

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जामनेर तालुक्यातील शेंगोळे येथे सुरू असलेली सालाबादप्रमाणे यात्रा आता पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांदेखत अवैध धंद्यांचे मोठे केंद्र बनली आहे. पोलीस बंदोबस्ताच्या सावलीतच दारूची विक्री तर खुलेआम क्लब, सोरट, पत्ता आणि जुगाराचे फड रंगत आहेत. तरीही पोलीस कर्मचारी हातावर हात धरून बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत.
शेंगोळा यात्रेत सुट्टीच्या दिवशी प्रचंड गर्दी असतानाही रस्त्यावर अवैध धंदेवाल्यांनी कहर माजवला होता. मनोरंजनासाठी लांबून आलेल्या कुटुंबांना, महिलांना आणि लहान मुलांना या जुगारी व दारू विक्रेत्यांचा सतत त्रास सहन करावा लागत आहे. कर्कश भोंगे लावून हुल्लडबाजी करणारे तरुण बेधुंदपणे फिरत आहेत, तरीही एकाही पोलीस कर्मचारीने त्यांच्यावर हातही उचललेला नाही.
स्थानिक नागरिकांचा संताप
“पोलीस बंदोबस्त आहे की ते फक्त फोटो काढण्यासाठी उभे आहेत? की हे सगळे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच चालू आहे?” असा सवाल थेट नागरिक विचारत आहेत. रोज लाखो रुपयांची उलाढाल असलेला हा अवैध व्यवसाय पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू आहे, तरी कारवाईचा पत्ताच नाही. यामुळे अनेक घरांमध्ये कलह वाढले आहेत, तरुणाई बरबाद होत आहे, तरीही प्रशासनाला याची खंत वाटत नाही.
कारवाई होणार का?
शेंगोळा यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन मोठा देखावा करते, आवाहन केले जाते. पण प्रत्यक्षात पोलीस बंदोबस्ताच्या नावाखाली अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे चित्र आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर, जुगार-दारू विक्रेत्यांवर कारवाई होणार की यंदाही फक्त “सहकार्याचे आवाहन” करून बोळवन केली जाणार? हा प्रश्न आता जोर धरू लागला आहे.
पोलीस निरीक्षकांना अभय कुणाचे?
शेंगोळे यात्रा आता मनोरंजनाची नाही, तर पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीची खुली बाजारपेठ बनली आहे. जर एवढ्या मोठ्या बंदोबस्तातही अवैध धंदे थांबत नसतील, तर हा बंदोबस्त नेमका कोणासाठी आहे? नागरिकांसाठी की गुन्हेगारांसाठी? हा प्रश्न पोलीस प्रशासनाला भेडसावत आहे आणि त्याचे उत्तर त्यांनी लवकर देणे गरजेचे आहे. जामनेर परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून देखील पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना पाठीशी घातले जात आहे. एकीकडे राज्याचे अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात हे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.






