जयश्रीताईंना नकोय पण राजुमामांना हवाय ‘हा’ उमेदवार!
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून तब्बल ३६ उमेदवार रिंगणात उतरले असून काहींनी माघार घेतली आहे. मोठे चेहरे अद्यापही मैदानात असून त्यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जळगावातील एक उमेदवार जयश्री महाजन यांना अडचणीचा तर राजुमामा भोळेंना फायदेशीर ठरू शकतो. तसेच इतर देखील तीन उमेदवार आ.सुरेश भोळे यांच्याच वोट बँकेचे नुकसान करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची बनली आहे. प्रथमच लेवा पाटील समाजाचे दोन उमेदवार आमने सामने आले असून त्यात चार प्रमुख बंडखोर उमेदवार देखील मैदानात उतरले आहेत. भाजपचे आमदार राजुमामा भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून माजी महापौर जयश्री सुनील महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोघांच्या उमेदवारीने इतर तिघे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत तर मनसे आणि वंचित बहुजन आघाडीने देखील उमेदवार दिले आहे.
अपक्ष बंडखोर वाढवणार डोकेदुखी?
भाजपचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, माजी नगरसेवक मयूर कापसे, शिवसेना उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. जळगावात मराठा पाटील समाजाचे मोठे मतदान असून ते कुलभूषण पाटील आणि मयूर कापसे यांच्यात विभागले गेल्यास त्याचा फटका जयश्री महाजन यांना बसू शकतो. मात्र आ.राजुमामा भोळे यांना गेल्या पंचवार्षिकला पिंप्राळा हुडको परिसरातून मोठे मताधिक्य असल्याने ते वळल्यास त्यांना देखील फटका बसू शकतो. कोळी समाज जळगावात मोठा असून डॉ.अश्विन सोनवणे यांच्या उमेदवारीने ते मतदान वळल्यास आ.भोळे यांना त्याचा फटका बसेल.
एकच उमेदवारावर मोठी भिस्त
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मुस्लीम मतदारांचा आकडा मोठा आहे. शहरात साधारणतः ६० हजारांच्या जवळपास मुस्लीम मतदार आहेत. मुस्लीम समाजातील एक नावाजलेल्या सुशिक्षित सालार कुटुंबातील अजीज सालार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाज बऱ्यापैकी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होता. विधानसभेला देखील तोच पवित्रा असल्यास त्याचा भाजपला फायदा होऊन महाविकास आघाडीला फटका बसू शकतो. मुस्लीम मताचे विभाजन झाल्यास जयश्री महाजन यांचे नुकसान होऊन राजुमामांना फायदा होईल. उद्या उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून अजीज सालार उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याकडे लक्ष लागून आहे.