JCMC Election : भयमुक्त प्रभागाचा नारा, दिनेश ढाकणे यांचा वादा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील जुना प्रभाग १९ म्हटला म्हणजे अनेक भागात गल्लोगल्ली दादा, भाऊ सारखे गुंड. जनता कायम दहशतीत.. नवीन प्रभागात बराच बदल झाला असला तरी इच्छुक भाऊ, दादा मात्र कायम आहेत. प्रभागाला भयमुक्त वातावरण देत विकासाच्या लाटेवर स्वार होऊन नगरसेवक पदाच्या मैदानात उतरण्यास तयार असलेल्या दिनेश मधुकर ढाकणे या उमद्या कार्यकर्त्याला जनतेची तुफान साथ लाभत आहे.
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरु होणार असून केव्हाही आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगावात अनेक इच्छुकांनी आपल्या प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केल्याने पक्ष देखील कमळा लागले आहेत. अशाच प्रभाग १९ मधील दिनेश मधुकर ढाकणे या ३६ वर्षीय युवा उमेदवाराची यशस्वी गाथा आम्ही आज मांडणार आहोत.

सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्तिमत्व
दिनेश मधुकर ढाकणे हे व्यवसायाने बांधकाम क्षेत्रात असले तरी ते एका सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. दिनेश यांचे वडील महापरिवहन सेवेत बस चालक तर आई गृहिणी होत्या. जेमतेम परिस्थितीतून शिक्षण घेत आज त्यांनी मोठे नाव कमावले आहे. एकीकडे प्रभागातील बरेच तरुण चुकीच्या वाटेला जात असताना दिनेश मात्र आपली वेगळी ओळख आणि स्वच्छ प्रतिमा निर्माण करून आहेत.

पदाला साजेसे जनसेवेचे काम
नगरसेवक म्हटला म्हणजे तो केवळ नावलाच नसावा तर तो अगोदर जनसेवक असायला हवा. दिनेश ढाकणे आजही जनतेच्या मनातील नगरसेवक आहे. वज्रकवच फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आजवर आपल्या प्रभागात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, शिवमहापुराण कथा, नवरात्र मंडळांचा सन्मान असे अनेक उपक्रम राबवले आहेत. तसेच भाजप युवा मोर्चा महानगर चिटणीस म्हणून पक्षश्रेष्ठी आणि नेत्यांच्या माध्यमातून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्न केले आहेत.

रस्त्यांसाठी रस्त्यावर बसलेला कार्यकर्ता
प्रभाग क्रमांक १९ मधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यामुळे नागरिकांना अतोनात त्रास होत होता मात्र कुणीही आवाज उठवत नव्हते. रस्त्यांवरील खड्डे वाढतच होते अखेर दिनेश ढाकणे यांनीच पुढाकार घेतला आणि आंदोलन पुकारले. चक्काजाम आंदोलनाची दखल प्रशासनाला देखील घ्यावी लागली आणि आज त्याठिकाणी चांगले रस्ते तयार झाले आहेत.
चौफेर विकासाचे ‘क्लिअर व्हिजन’
दिनेश ढाकणे हे प्रभाग क्रमांक १९ मधून नगरसेवक पदासाठी इच्छूक आहेत. प्रभागातील जनतेचा देखील त्यांच्यावर दृढ विश्वास असून पक्षाने त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी जनतेची आग्रही मागणी आहे. दिनेश यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘क्लिअर व्हिजन’ ठेवले आहे. तरुणांना मैदान, अभ्यासिका उपलब्ध करून देणे, महिला, कामगारांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, बचत गटांसाठी मिनी मॉल तयार करून देणे, भयमुक्त प्रभाग निर्माण करणे, प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा सर्वांगीण विकासासाठी ते कायम प्रयत्नशील असणार आहेत.





