जळगाव मनपा निवडणूक : आ.राजुमामा भोळेच ‘किंगमेकर’, आ.चव्हाण ‘हुकुमी एक्का’!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाने आपल्या जबाबदारी निश्चित केल्या आहेत. जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांची प्रभारी म्हणून आणि जळगाव शहरातील लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांच्यावर ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उमेदवारी निश्चिती ते मनपात आपला झेंडा फडकवण्यात आ.भोळे हेच किंगमेकर असणार आहेत.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत राजूमामांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या संघटन कौशल्यावर पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे. प्रदेशाध्यक्षांनी दाखवलेला हा विश्वास राजूमामांच्या राजकीय कारकीर्दीतील एक मानाचा तुरा ठरला आहे. गुरूवारी प्रदेशाध्यक्षांनी तसे पत्र जारी केले आहे. दरम्यान, चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांच्यावर जळगाव मनपा प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आ.राजूमामा भोळे यांची निवड जाहीर होताच जळगावमधील भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे. राजूमामांचे संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेली त्यांची घट्ट ‘नाळ’ आणि कोणतीही निवडणूक जिंकण्याची जिद्द, यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच ‘झेंडा ’ फडकणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल आ.सुरेश भोळे (राजूमामा) यांचे सर्वच समर्थक आणि इच्छुकांकडून जोरदार अभिनंदन होत आहे.






