जळगावमध्ये रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड

जळगावमध्ये रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद — १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड
जळगाव, : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डॉ. केतकी पाटील फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्याद्वारे विविध नामांकित आस्थापनांमध्ये एकूण १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी आमदार सुरेश भोळे, डॉ. केतकी पाटील, संदीप गायकवाड (सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास), नवनीत चव्हाण (जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी) आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्या करिता हिताची अस्टोमो प्रा.लि. बांभोरी, नोव्हेंचर इलेक्ट्रीकल अॅण्ड डिजीटल सिस्टीम प्रा.लि. जळगाव, नोवेल सिडस, छबी इलेक्ट्रीकल जळगाव, स्पेक्ट्रम प्रा.लि. जळगाव, ऊर्जा हेल्थ केअर, टेक्नोटस्क सोल्युशन, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, उत्कर्ष स्मॉल फायनन्स लि., स्विगी प्रा.लि., जॉन डिअर प्रा.लि. पुणे, मेरिको लिमिटेड, जळगाव अशा आस्थापनांनी ६५५ रिक्त पदांची माहिती दिली. एकूण ३१० उमेदवारांनी सहभाग घेतला असून, त्यापैकी २३५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यामधून १७२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
यावेळी विविध महामंडळांचे माहिती स्टॉल्स देखील लावण्यात आले होते. शासनाच्या योजनांची माहिती देणे, तसेच उमेदवारांना करिअर मार्गदर्शन मिळावे या हेतूने मेळावा उपयुक्त ठरला.