चाऱ्याच्या शेडमधून ३८ हजारांची विदेशी व देशी दारू जप्त

चाऱ्याच्या शेडमधून ३८ हजारांची विदेशी व देशी दारू जप्त
कासोदा (प्रतिनिधी) – पोलीस अधीक्षक डॉ. सो. जळगाव यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या “ऑल आऊट मोहिम” अंतर्गत कासोदा पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत आंबे-बाम्हणे (ता. एरंडोल) परिसरातील ताडे रस्त्याच्या बाजूला चाऱ्याच्या शेडच्या आडोशाला अवैधरीत्या साठवून ठेवलेली देशी व विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई रविवारी, २१ जुलै रोजी रात्री ८ वाजता करण्यात आली असून आरोपी किरण भारत पाटील (वय ३९, रा. बाम्हणे, ता. एरंडोल) याला अटक करण्यात आली आहे.
शेडच्या आडोशाला लपवलेला दारूचा साठा
पोलिसांनी अचानक धाड टाकून किरण पाटील याच्या ताब्यातील प्रोव्हिजन माल हस्तगत केला. त्यामध्ये विविध ब्रँडच्या देशी व विदेशी दारूच्या एकूण ३८,१७५ रुपये किंमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. यात मॅकडॉल नं. १, रॉयल चॅलेंज, गोवा जिन, ओल्ड मंक रम, ऑफिसर्स चॉईस, रॉयल स्टॅग, मॅकडॉल रम, तसेच सखु संत्रा, टँगो पंच आणि सोफ डिलक्स या देशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.
गैरकायदेशीर विक्रीसाठी साठा
किरण पाटील हा कोणतीही परवानगी नसताना चोरट्या मार्गाने दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने सदर साठा ठेवत असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कासोदा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयुक्तपणे केली असून गावात अवैध दारूविक्रीवर आळा बसावा यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.