कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘मानवविज्ञान संशोधन प्रकल्प’ कार्यशाळा संपन्न

महा पोलीस न्यूज । दि.२६ जुलै २०२५ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र नॉलेज सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, गोंडवाना विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एस.एन.डी.टी विद्यापीठ मुंबई या सात विद्यापीठांसाठी मानवविज्ञान विद्याशाखेतील संशोधन प्रकल्प या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आज दि. २६ जुलै रोजी आयोजन विद्यापीठात करण्यात आले.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे, प्रमुख वक्ते म्हणून गोखले संस्थेचे डॉ. किरण लिमये, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, महाराष्ट्र नॉलेज सेंटरच्या शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. सुचिता कुलकर्णी, मानवविज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्राचार्य जगदीश पाटील मंचावर उपस्थित होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू एस. टी. इंगळे यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणारे संशोधन हे औद्योगिक विकासाशी संबंधित असते मात्र या कार्यशाळेच्या माध्यमातून जे संशोधन होणार आहे ते मानवाच्या भावना, मन अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून सुकाणू समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
मानव विज्ञान विद्या शाखेतील संशोधन प्रकल्प संदर्भात सहकार्य, उद्योग/संशोधन संस्था व विद्यापीठ यांच्यात सेतू निर्माण करणे आणि नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने प्रकल्प निवडीसंदर्भात मार्गदर्शन करणे याकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र व महाराष्ट्र नॉलेज सेंटर पुणे यांच्यात सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. या करारावर कुलसचिव डॉ.विनोद पाटील तर महाराष्ट्र नॉलेज सेंटरतर्फे डॉ. सुचिता कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केल्या.
प्र. अधिष्ठाता प्राचार्य जगदीश पाटील यांनी या कार्यशाळेचा उद्देश व आवश्यकता आपल्या भाषणातून स्पष्ट केली. प्रास्ताविक व केंद्राची माहिती डॉ. सुचिता कुलकर्णी यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कक्षाधिकारी प्रवीण चंदनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी मानले. उद्घाटनानंतरच्या सत्रात डॉ. किरण लिमये यांनी संख्यात्मक संशोधनाची ओळख या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी महाराष्ट्र नॉलेज सेंटर च्या कविता साठे, अनिता घाटणेकर, डॉ. चारुलता लोंढे यांनी व्यवस्थापन केले.
या कार्यशाळेत एकूण ५८ अध्यापक सहभागी झाले. कार्यशाळेचा समारोप प्र. कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.