Education

पुन्हा उजळल्या आठवणी, अंजाळेतील नूतन विद्या मंदिरात २५ वर्षांनी एकवटले शाळेचे विद्यार्थी!

पुन्हा उजळल्या आठवणी, अंजाळेतील नूतन विद्या मंदिरात २५ वर्षांनी एकवटले शाळेचे विद्यार्थी!

प्रतिनिधी I चोपडा 

कधी काळी एकत्र बसून शिक्षण घेतलेले, एकत्र खेळलेले, स्वप्नं पाहिलेली तीच मंडळ आज २५ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच शाळेच्या प्रांगणात भेटली. अंजाळे येथील नूतन विद्या मंदिर विद्यालयात इयत्ता १० वी (वर्ष २०००–२००१) च्या बॅचचे स्नेहसंमेलन शनिवारी अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले.

काळाच्या प्रवाहात सर्वजण आपल्या व्यवसाय, उद्योग, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये गुंतले होते. मात्र, या स्नेहसंमेलनाने सर्वांना पुन्हा एकदा शाळेच्या त्या आठवणींमध्ये नेऊन ठेवले. बालपणीच्या खोड्या, परीक्षेच्या आधीची धडपड, वर्गातील गप्पा, आणि शिक्षकांचे मायेचे ओरडणे – या सगळ्यांनी सभागृहात एक वेगळाच भावनिक वातावरण निर्माण केला.

विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या बाकांवर बसत “तो काळ” जिवंत केला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, काहींनी जुन्या आठवणी सांगताना भावनिक होत एकमेकांना मिठ्या मारल्या. “आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र भेटतात, पण शाळेतील मैत्री ही निरागस, नि:स्वार्थ आणि आयुष्यभर हृदयात जपण्यासारखी असते,” असा सूर सर्वांच्या मनात होता.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री. बी. आर. पाटील सर यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात प्रामाणिकपणा, श्रम आणि पालकांची सेवा यांचे महत्त्व पटवून दिले. “पालक हीच खरी देवता, त्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा,” असा हृदयस्पर्शी संदेश त्यांनी दिला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निलीमा झोपे मॅडम यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बी. ई. चौधरी सर, डी. आर. पाटील सर, डी. व्ही. बोरोले सर, पराग चौधरी सर उपस्थित होते.

सर्वांनी एकत्रितपणे सहभोजनाचा आनंद घेत, जुने क्षण पुन्हा अनुभवले. कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत थंड पाण्याचे वॉटर कूलर भेट दिले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र ग्रुप फोटो काढत “दरवर्षी असे स्नेहसंमेलन आयोजित करून हे नाते अधिक घट्ट ठेवूया” असा निर्धार केला. आनंद, आठवणी आणि भावनांनी ओथंबलेले हे स्नेहसंमेलन सर्वांच्या मनात कायमस्वरूपी कोरले गेले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button