खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या १९ वर्षापासून फरार बंदी एलसीबीच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । दि.२७ मार्च २०२५ । धुळे तालुका पोलिस स्टेशनच्या खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आणि १९ वर्षांपासून फरार असलेला बंदीवान कैदी अखेर स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या जाळ्यात सापडला. पुण्यात लपून राहत असलेल्या या आरोपीला गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. गोपाळ रावण वाघ (रा.धुळे) असे या आरोपीचे नाव आहे. २००६ मध्ये घडलेल्या खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षेच्या दरम्यान तो २००८ मध्ये फरार झाला होता.
धुळे तालुका पोलीस स्टेशनचे खुनाचे गुन्ह्यातील शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ, रा.शासकिय दुध डेअरी मागे, धुळे याने पोहरे ता.चाळीसगाव येथील त्याचे नातेवाईकांला जामीनदार म्हणुन नमुद करून सन २००६ मध्ये शिक्षा भोगत असताना रजेवर गावी आला होता. त्यानंतर तो पुन्हा रजा संपल्यानंतर शिक्षा भोगण्याकरीता कारागृहात हजर झालेला नव्हता. त्यावरून मेहुणबारे पो.स्टे. भाग ५ गुरनं ३०१५/२०१४ भादवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एलसीबी पथकाला मिळाली माहिती
गुन्हा दाखल झाल्यानंतर बरेच दिवसापासून शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ याचा वेळोवेळी शोध घेत असतांना देखील तो मिळून येत नव्हता. त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला तो त्याची ओळख लपवून पुणे येथे राहत असल्याची बातमी मिळाली होती. त्यावरून पथकाने त्याची खात्री करणे बाबत गोपनीय बातमीदारास कळविले असता, गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ हा धुळे येथील रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली.
पुणे, नगर, धुळे असा प्रवास, नाशिकला रवानगी
पथकाने सुरुवातीला माहिती घेतली तेव्हा कैदी पुणे येथे असल्याने पथक त्याठिकाणी केले. त्यानंतर तो अहिल्यानगर येथे आल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्याठिकाणी धाव घेतली मात्र तो धुळे येथे गेल्याचे समजले. मिळालेल्या बातमीची खात्री करून पथकाने शिक्षा बंदी कैदी गोकुळ रावण वाघ यास ताब्यात घेवून त्यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी मेहुणबारे पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे. त्यावरून मेहुणबारे पोलिसांनी त्यास पुढील जन्मठेपेची शिक्षा भोगणे कामी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे जमा करण्यात आले आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पो.उप.नि.शेखर डोमाळे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, दिपक चौधरी यांनी केली आहे.