‘महा पोलीस न्यूज’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब : जळगाव एलसीबी निरीक्षकपदी बबन आव्हाड!
महा पोलीस न्यूज | १२ जून २०२४ | जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी बबन आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आव्हाड यांच्याकडे एमआयडीसी पोलीस ठाण्याची जबाबदारी असून एलसीबीचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी काढले.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील हे दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांची जागा रिक्त होती. एलसीबी निरीक्षक पदी अनेक चेहरे इच्छुक होते. महा पोलीस न्यूजने याबाबत वृत्त दिले होते. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे एलसीबीचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
सध्या नाशिक विभाग शिक्षक मतदान निवडणुकीची आचारसंहिता सुरू असून ती ७ जुलैपर्यंत असणार आहे. आचारसंहिता काळात बदली होऊ शकत नसल्याने निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान, आचारसंहिता संपताच बबन आव्हाड यांची नेमणूक कायम होण्याची दाट शक्यता आहे.