महादेव बेटिंग अॅप : ९३ जणांविरुद्ध गुन्हा, जळगावच्या तरुणाचा समावेश

महा पोलीस न्यूज । २० मे २०२४ । महादेव बुक अॅप या बेकायदा बेटिंग अॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून, जुगारातील पैसा परदेशातही वळवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून अॅपच्या माध्यमातून अनेक बडे कलाकार आणि बुकी यात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलिसांनी नुकतेच एका इमारतीत टाकलेल्या छाप्यात अधिकची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे परिसरातील नारायणगावातील एका इमारतीत नुकतेच पोलिसांनी छापा टाकून ६२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, जुगारातील आर्थिक व्यवहारांसाठी ४५२ बँक खात्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. इतकच नव्हे तर महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांपैकी ८८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
६२ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल जप्त
महादेव बेटिंग अॅपच्या माध्यमातून बेकायदा सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर देशभरात कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नुकतेच नारायण गावातील एका इमारतीत छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल संच, तसेच आरोपींच्या वापरातील १०१ मोबाइल आणि ४५२ बँक खात्यांची पुस्तिका व अन्य साहित्य असा ६२ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बँक खात्यांची होणार चौकशी : पंकज देशमुख
पोलिसांनी याप्रकरणात ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयीत आरोपींनी ऑनलाइन सट्टेबाजीसाठी बँक खात्यांचा वापर केला आहे. ही खाती कोणाच्या नावे काढण्यात आली आहेत; तसेच बनावट कागदपत्रांचा वापर करून खाती काढण्यात आली आहेत का, या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अटकेतील आरोपीत जळगावच्या तरुणाचा समावेश
पोलिसांनी महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ९३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ८८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात कुणाल सुनील भट (वय २८, रा. विवेकानंदनगर, जळगाव), समीर युनूस पठाण (२५, शुक्रवार पेठ, जुन्नर), अमजद खान सरदार खान (३२, लखनौ), यश राजेंद्रसिंह चौहान (२६ जय गणेशनगर, जयपूर), रशीद कमाल रफिउल्ला (२८, वजिराबाद, दिल्ली) यांना अटक करण्यात आली आहे. हे उच्च शिक्षित आरोपी नारायणगावातील ऑनलाइन जुगाराचे कामकाज सांभाळत असल्याची माहिती आहे.