घरफोडीसह मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना बुलढाण्यातुन अटक!

घरफोडीसह मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील तिघांना बुलढाण्यातुन अटक!
एक लाखांचा ऐवज जप्त; मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी
सूभाष धाडे मुक्ताईनगर
मुक्ताईनगर शहरात ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन घरफोड्या आणि दोन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ९४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऐवजात दोन मोटारसायकली, सोन्या-चांदीचे दागिने, रोख १० हजार रुपये आणि चोरीसाठी वापरलेले स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन यांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी प्रदीप हिवराळे (वय ३०), अतुल हिवराळे (वय ३०) आणि रवी हिवराळे (वय ४०) हे तिघेही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंबिकापूर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपींनी आंबेडकर नगर आणि पंचायत समिती परिसरात दोन घरफोड्या केल्या होत्या. तसेच घोडसगाव आणि मुक्ताईनगर शहरातून दोन मोटारसायकली चोरी केल्या होत्या.
चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये बजाज कंपनीची डिस्कव्हर (एम.एच.१९-बीएन ६६४५) आणि होंडा कंपनीची एसपी शाईन (एम.एच.१९-ईओ २८०२) या दुचाकींचा समावेश आहे.
तसेच १ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, १२ भार चांदी जोडवे व तोड्यांचा संच, १५ भार चांदीचे दागिने, पाचशे रुपयांच्या वीस नोटा आणि चोरीसाठी वापरलेले स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे मुक्ताईनगर पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील अंबिकापूर येथे सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, हवालदार महेंद्र सुरवाडे, हेड कॉन्स्टेबल अजय खंडेराव, कॉन्स्टेबल रवींद्र धनगर, अमोल जाधव आणि अक्षय वाडे यांचा समावेश होता. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांनी मार्गदर्शन केले.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी केले.






