शेतकरी कर्जमाफीसाठी महाविकास आघाडी आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीस व गिरीश महाजन यांच्या बॅनरवर शाई फेक

शेतकरी कर्जमाफीसाठी महाविकास आघाडी आक्रमक; मुख्यमंत्री फडणवीस व गिरीश महाजन यांच्या बॅनरवर शाई फेक
जळगाव (प्रतिनिधी) :
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीने दिनांक १६ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत महायुती सरकारच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या बॅनरवर काळी शाई फेकत निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, मंगला पाटील व सौ. कल्पिताताई पाटील यांनी केले. त्यांनी इशारा दिला की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यात शेतकरी कर्जमाफीबाबत निवेदन देण्यासाठी आमच्या शिष्टमंडळाला पाच मिनिटांचा वेळ द्यावा, अन्यथा त्यांच्या ताफ्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.”
आंदोलनादरम्यान “या सरकारचं करायचं काय – खाली डोकं वरती पाय”, “शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे”, “जय जवान जय किसान” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण तापवले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष सौ. कल्पिता पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष उमेश पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोजभाऊ चौधरी, तसेच छगन खडसे, आबा कोळी, प्रभाकर कोळी, विशाल सोनावणे, कुंदन कोळी, प्रमोद घुगे, सचिन चौधरी, भाऊराव इंगळे, किरण राजपूत, गौरव वाणी, मतीन सैय्यद, रहीम तडवी, राजू पाटील, एके खाटिक, राजू मोरे, सुनील माळी, फरहान शेख, विशाल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेले हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.