महावितरणकडून अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी शिबिरे; चार जणांना नियुक्तीपत्र

जळगाव : महावितरणच्या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी जळगाव परिमंडल कार्यालयाच्या अंतर्गत जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील मंडल कार्यालयांमध्ये ५ ऑगस्ट रोजी मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. या शिबिरानंतर, दिवंगत कर्मचाऱ्यांच्या चार अवलंबितांना तात्काळ नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. जळगाव मंडल कार्यालयाच्या शिबिरात सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश बुरंगे आणि जळगाव मंडळाच्या व्यवस्थापक (मानव संसाधन) तन्वी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या अधिकाऱ्यांनी उपस्थित अवलंबितांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले आणि महावितरणच्या अनुकंपा तत्त्वाविषयी माहितीपुस्तिका दिली.
यावेळी सर्व विभागीय कार्यालयांच्या उपव्यवस्थापकांना (मानव संसाधन) अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. या शिबिरांचा लाभ जळगाव मंडलातून १७, धुळे मंडलातून १५ आणि नंदुरबार मंडलातून ३ अशा एकूण ३५ अवलंबितांनी घेतला.
शिबिरानंतर, एका कनिष्ठ सहायक (मानव संसाधन), दोन विद्युत सहायक आणि एका कनिष्ठ कार्यालयीन सहायकाला नियुक्तीपत्र देण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिमंडलातील मानव संसाधन विभागाच्या सर्व व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापकांनी विशेष परिश्रम घेतले.