जळगावात शोककळा : उच्चदाब विद्युत वाहिनीचा धक्का बसून बाप-लेकीचा मृत्यू, भाची गंभीर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील अक्सानगर परिसर संतोषी माता मंदिर रस्त्यावर आज शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका बसल्याने बाप-लेकीचा मृत्यू झाला असून लहान भाची गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मास्टर कॉलनीजवळ असलेल्या अक्सानगर परिसरात मौलाना साबीर खान नवाज खान वय-३६ हे पत्नी, आई, वडील आणि २ मुली, १ मुलासह राहतात. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास मोठी भाची मारिया फातेमाबी वय-१२ ही घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेली होती. कपडे वाळत घालताना तिच्या स्पर्श जवळच असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीला झाला.
मुलीला वाचवण्याचा प्रयत्न पण..
मारिया हिस विजेचा झटका बसल्याचे पाहून मामे बहीण आलिया वय-१६ हिने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला देखील विजेचा झटका बसला. दोन्ही मुली संकटात असल्याचे पाहून मौलाना साबीर खान यांनी धाव घेतली. ते देखील विद्युत वाहिनीच्या गर्तेत अडकले.
बाप-लेक ठार, भाची गंभीर जखमी
उच्च दाब विद्युत वाहिनीचा जोरदार झटका बसल्यामुळे मौलाना साबीर खान, मुलगी आलिया यांचा जागीच मृत्यू झाला असून भाची मारिया फातिमा ही गंभीर जखमी झाली आहे. जखमी भाची हिस उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रुग्णालयात गर्दी, नातेवाईकांचा आक्रोश
दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी आणण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि समाजातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. दरम्यान, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :





