वीज तार चोरणारी गँग गजाआड, ३८०० मीटर तार हस्तगत

महा पोलीस न्यूज । दि.९ ऑक्टोबर २०२४ । शेतातून विद्युत तार चोरी होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात मोठ्याप्रमाणात वाढले होते. जळगाव एलसीबी पथकाने गेल्याच महिन्यात एक गँग पकडून ६१ गुन्हे उघड केले होते. पुन्हा पथकाने एक गँग गजाआड केली असून ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तिघांकडून चोरीची ३८०० मीटर तार हस्तगत करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शेतातील इलेक्ट्रीक पोलवरील तार चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतचे गुन्हे उघउकीस आणणे बाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना आदेश दिले होते. एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कासोदा व एरंडोल शेत शिवारातील इलेक्ट्रीक पोलवरील तार चोरी करणारे इसम एरंडोल शहरात संशयीतरीत्या फिरत असल्याची बातमी मिळाली होती.
पथकाने त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी रविंद्र अनिल मिस्तरी वय ३८ रा.साई नगर, एरंडोल, धनराज प्रकाश ठाकुर वय ४६ रा.अमळनेर दरवाजा, एरंडोल, समाधान नारायण पाटील वय ४५ रा.नारायण नगर, एरंडोल असे सांगीतले. त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शेतातील तार चोरी केल्याबाबत कबुली दिली. तिघांकडून एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल ५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ३८०० मीटर विजेची तार हस्तगत करण्यात आली असून आरोपीतांना पुढील तपासकामी एरंडोल पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे, गोरख बागुल, भारत पाटील यांनी केली आहे.