ब्रेकिंग : “डिजिटल अरेस्ट”चा बोगस तुरुंग दाखवून वृद्धेला सव्वाकोटींचा गंडा, जळगावचे दोघे ठक जाळ्यात

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । सायबर गुन्हेगारांच्या धाडसी कारनाम्याने पुन्हा एकदा नागरिक हादरले आहेत. “डिजिटल अरेस्ट” नावाचा बोगस तुरुंग तयार करून ७२ वर्षीय वृद्धेला तब्बल सव्वाकोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या आधुनिक ठकसेनांना मुंबई सायबर पोलिसांनी जळगावातून जेरबंद केले असून रोहित संजय सोनार आणि हितेश पाटील अशी दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ते २६ ऑगस्टदरम्यान टोळीने महिलेला फोनवरून सीबीआय, दिल्ली पोलीस आणि उच्च न्यायालयाचा बनाव करून धमकावले. “मनी लॉंड्रिंगसारख्या गुन्ह्यांत तुझा सहभाग आहे, चौकशीदरम्यान तुला अटक होईल” अशी भीती दाखवली. यालाच “डिजिटल अरेस्ट” अशी अट र्म देत घराबाहेर जाण्यास, इतरांशी संपर्क साधण्यास बंदी घालण्यात आली. भीतीने महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली आणि तिला जबरदस्तीने पैसे ट्रान्स्फर करायला लावले. “अटक टाळायची असेल तर नियम पाळ” असा दम भरून अखेर या ठगांनी तब्बल १.२५ कोटी रुपये उकळले.
४८ तासात दोघे जाळ्यात
फसवणुकीची जाणीव होताच महिलेनं सायबर सेलकडे धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासात आरोपी रोहित सोनारच्या खात्यात फसवलेली रक्कम जमा झाल्याचे समोर आले. ती रक्कम हितेश पाटीलमार्फत परदेशातील सायबर टोळीपर्यंत पोहोचवली जात होती. बदल्यात या दोघांना ठराविक हिस्सा कमिशन स्वरूपात मिळत होता. शेवटी सायबर पोलिसांच्या पथकाने जळगावमधून या दोघांना हेरले.
दोघांना पोलीस कोठडी
चौकशीसाठी दोघांना मुंबईत आणण्यात आले असून वांद्रे न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. “डिजिटल अरेस्ट” नावाचा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. फोनवरून येणाऱ्या कोणत्याही धमक्यांना बळी पडू नका, थेट पोलिसांकडे तक्रार करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






