जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार बहिणींच्या खात्यावर पैसे जमा : ना.गुलाबराव पाटील
महा पोलीस न्यूज । दि.१९ ऑगस्ट २०२४ । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये जिल्ह्यातील अंदाजे 4 लाख 25 हजार बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
पुणे येथून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थिती पार पडलेल्या ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ‘ शुभारंभ कार्यक्रम जळगाव जिल्हा नियोजन भवनच्या सभागृहात थेट प्रेक्षपणांनी दाखविण्यात आला. यावेळी आ. सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, मोठया संख्येनी पात्र बहिणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमानंतर संवाद साधताना पालकमंत्री बोलत होते.
जिल्ह्यात आज अखेर 4 लाख 25 हजार बहिणींच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित बहिणींचे पैसे लवकरच जमा होणार आहे.जिल्ह्यात पात्र महिलांची संख्या 5 लाख 23 हजार 59 एवढी असून काहींच्या आधार लिंक व्हायचे आहेत. ते होताच त्यांनाही पैसे मिळतील असे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले. बहिणींनी कोणत्याही अफ़वाला बळी पडू नये असे सांगून एकही पात्र महिला या योजनेतून सुटणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बहिणींनी बांधल्या राख्या
पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे, प्रधान सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित या मान्यवरांना या कार्यक्रमाच्या ठिकाणी इथे उपस्थित बहिणींनी औक्षण करून राखी बांधली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुणे येथील कार्यक्रमाचे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी सांगितले.