महायुती सरकार कायम देणारे सरकार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महा पोलीस न्यूज । दि.१३ ऑगस्ट २०२४ । मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजनेत ३ मोफत सिलेंडरमुळे संसाराचा गाडा हाकताना ओढाताण काहीशी कमी होणार आहे. आज मला लाखो, करोडो भगिनी मिळाल्या हे माझे भाग्य आहे. तुमची माया माझ्यामागे अशीच कायम राहो. काही लोक म्हणतात, महिलांना लाच देतात, भीक देतात, महिलांना विकत घेतले, अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांना आता भगिनीचं ठीक करणार आहे. भगिनींसाठी योजना आणल्यावर लाडक्या भाऊसाठी देखील योजना आणली. शेतकऱ्यांसाठी योजना आणली. महाविकास आघाडीने कधीही देण्याचे काम केले नाही, महायुती सरकार कायम देणारे सरकार आहे. लाडक्या बहिणींना वर्षभर दर महिन्याला दिलेला हा मायेचा आहेर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मंगळवारी जळगावात करण्यात आला. सागर पार्क मैदानावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लाडकी बहीण योजना चांदा ते बांदा लोकप्रिय झाली म्हणून विरोधकांचा वांधा झाला आहे. सरकार आज पडेल, उद्या पडेल असे म्हणत होते मात्र आज २ वर्ष झाले सरकार सुरळीत सुरु आहे. महिलांसाठी आणलेल्या योजना पाहून विरोधक घाबरले आहेत. दि.१७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात २ महिन्याचे पैसे जमा होणार म्हणजे होणारच. सर्वांचे अर्ज स्वीकारण्यात येतील, त्यामुळे काळजी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले. जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीच्या विकासासाठी तात्काळ सूचना देण्यात येतील, शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले मानपत्र
सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत पार पडले. जिल्ह्यातील काही भगिनींनी मान्यवरांना राखी बांधली व एक सन्मानचिन्ह देण्यात आले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक शॉर्ट फिल्म दाखवल्यावर जिल्ह्यातील सर्वांच्या माध्यमातून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. धरणगाव बालकवी स्मारकाचे ई भूमीपूजन करण्यात आले.
कुणीही अफवांना बळी पडू नये : ना.गुलाबराव पाटील
हाती बांधायला राखी बहीण हवी एक, बहिणीच्या नात्याला जपायला प्रत्येक घरी हवी लेक. जळगाव जिल्ह्यात ५ लाख २० हजार अर्ज भरले. वर्षाला ४० कोटी रुपये मिळणार आहे. महिलांसह सर्व घटकांसाठी आपण योजना राबवल्या. काही लोक आपल्याबद्दल अफवा पसरवत आहे परंतु शासनाने ३५ हजार कोटी मंजूर केले आहे, म्हणून कुणीही अफवांना बळी पडू नये. येत्या काही महिन्यात विरोधकांचे टांगा पलटी, घोडे फरार होणार आहे. जिल्ह्यात नारपार योजना, केळी महामंडळ, सिंचन योजना, बहिणाबाई स्मारकासह अनेक योजनांसाठी शासनाने निधी दिला. आज इथे बसलेल्या महिला भगिनींची गर्दीच सांगते की ही योजना छप्पर फाड योजना आहे, असे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले.
हे पैसे परत घेण्यासाठी नाही, तुमच्यासाठी दिलेले आहे : अजित पवार
निवडणूक येतात आणि जातात पण सरकार म्हणून गरीब, महिला, युवा, शेतकरी, वृद्ध यांच्यासाठी काय करू शकतो याचा विचार आम्ही सरकार म्हणून अर्थसंकल्पात केला. निवडणुका लक्षात घेऊन आम्ही योजना आणलेल्या नाही. पुढील ५ वर्षात एका महिलेला ९० हजार रुपये मिळणार आहेत. विरोधक योजनेला विरोध करीत होते. गैरसमज करू नका परंतु योजनेतील बऱ्याच त्रुटी कमी केल्या आहेत. घाबरू नका अजूनही काही महिलांचे अर्ज भरले गेले नसतील तर त्यांचा समावेश करण्यात येईल. हे पैसे परत घेण्यासाठी नाही, तुमच्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे कुणीही काही बोलले तर त्यावर विश्वास ठेवू नका. योजनेमुळे राज्याच्या विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही. वर्षाला ४६ हजार कोटी महिलांच्या खात्यात जाणार आहे. मतदान तुमचा अधिकार आहे मात्र राज्याच्या विकासासाठी कमळ, घड्याळ, धनुष्यबाण चिन्हावर मतदान करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सावत्र भावांपासून सावध रहा : देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींना भेटण्याच्या दौऱ्याची सुरुवात जळगाव जिल्ह्यापासून केली. ज्या देशातील महिला विकसित होतील तोच देश विकसित होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात. त्यामुळेच राज्यात ही योजना राबवण्यात आली. कोट्यवधी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा आमचा मानस आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम करत आहोत. महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला तर काहींच्या पोटात दुखू लागले. १५०० रुपयात बहिणीचे प्रेम कुणीच विकत घेऊ शकत नाही, ही केवळ भाऊबीजेची भेट आहे. विरोधकांना संधी दिली होती त्यांनी कवडीपण दिली नाही. सावत्र भावांपासून सावध रहा. एकदा भाऊबीज दिली की त्या बदल्यात केवळ माया, प्रेम मिळते. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत कुणाचा बाप देखील पैसे परत घेऊ शकणार नाही. १ कोटी ३५ लाख महिलांचे अर्ज आले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी सुरू आहे. कदाचित कुणाचे पैसे आले नाही तर लगेच सावत्र भाऊ तुम्हाला भडकावतील मात्र चिंता करू नका, कुणालाही वंचीत ठेवणार नाही. एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सुट दिली त्याचा फायदा म्हणून एसटी महामंडळ नफ्यात आले. काही लोक खोटे बोलून बोलून निवडणूक जिंकू पाहत आहेत, असे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.