वाघूर नदीकाठच्या अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदारांचा छापा; सात वाहने जप्त

वाघूर नदीकाठच्या अवैध मुरूम उत्खननावर तहसीलदारांचा छापा; सात वाहने जप्त
भुसावळ प्रतिनिधी l 1 जुलै 2025 भुसावळ तालुक्यातील कडगाव शिवारातील वाघूर नदीच्या काठावर सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननाला सोमवारी तहसीलदार नीता लबडे यांच्या नेतृत्वाखालील महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने चाप बसवला. या धडक कारवाईत सहा डंपर आणि एक जेसीबी मशीनसह एकूण सात वाहने जप्त करण्यात आली.
वाघूर नदी परिसरात अवैध उत्खननाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार लबडे यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी छापा टाकला. कारवाईदरम्यान मुरूम भरणारी काही वाहने रंगेहाथ पकडली गेली. महसूल आणि पोलिस पथक येताच काही तस्करांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात यश आले.
जप्त केलेली सर्व वाहने आणि साहित्य नशिराबाद पोलिसांच्या बंदोबस्तात भुसावळ तहसील कार्यालयात सायंकाळी जमा करण्यात आले. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या मोहिमेत तहसीलदार नीता लबडे यांच्यासह मंडळाधिकारी रजनी तायडे, प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, तलाठी नितीन तेली, गोपाळ भगत, मंगेश पारिसे, रोशन कापसे, तेजस पाटील, जितेश चौधरी आणि संदीप पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.