मुक्ताईनगरात दारूमुळे भीषण अपघात; पादचारी गंभीर जखमी, अवैध दारूविक्रीवरून नागरिकांमध्ये संताप

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – शहरातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीतील बेफिकिरीमुळे पादचार्यांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. नुकत्याच घडलेल्या अपघाताने याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.
काही दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास बोदवड रोडवरील मुक्ताई चौकात वॉकिंगसाठी गेलेल्या दाम्पत्यावर दुचाकीस्वाराने अचानक धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीस तत्काळ जळगाव येथे दाखल करण्यात आले असून ते सध्या कोमात असल्याचे समजते.
साक्षीदारांच्या माहितीनुसार, अपघात करणारा दुचाकीस्वार अंदाजे ४० ते ४५ वर्षांचा असून तो अत्यंत मध्यधुंद अवस्थेत होता. वाहतुकीचे नियम न पाळता त्याने पादचार्यांवर वाहन आदळवून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मुक्ताई चौक परिसरात व शहरातील बोदवड रोडपासून भुसावळ रोडपर्यंत अनेक टपऱ्या, जेवणाची हॉटेल्स तसेच विविध ठिकाणी देशी दारू, हातभट्टी व अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची स्थानिक नागरिकांत चर्चा आहे. यामुळे मद्यधुंद वाहनचालकांचे प्रमाण वाढले असून पादचार्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या अपघातानंतर पोलीस प्रशासन काय पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनी अवैध दारू विक्रीवर तातडीने अंकुश घालण्याची मागणी केली आहे






