
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत स्पा सेंटर सुरु असल्याचे वृत्त महा पोलीस न्यूजने अनेकदा लावले होते. महा पोलीस न्यूजच्या पाठपुराव्यानंतर जळगाव एलसीबी आणि शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकत ४ तरुणींची सुटका केली होती. पोलीस आणि मनपा प्रशासनाला एका कारवाईनंतर जणू झोप लागली असून इतर स्पा चालक मालक अजूनही बिनधास्तपणे स्पा सेंटर चालवत आहेत. पोलिसांनी तरी पुढाकार मनपा प्रशासनाला तर याचे काही सोयरे सुतकच नसल्याचे दिसून येते.
जळगाव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली डझनभर ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे वृत्त महा पोलीस न्यूजने प्रसिद्ध केले होते. महा पोलीस न्यूजने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दि.१८ एप्रिल रोजी छापा टाकत कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात नयनतारा आर्केड मॉलमध्ये केलेल्या कारवाईमुळे इतरांचे चांगलेच धाबे दणाणले होते. जळगाव शहरातील मध्यवर्ती भागासह रिंगरोड, प्रभात कॉलनी परिसर, मेहरुण परिसर, खोटे नगर अशा परिसरात जवळपास १२ ठिकाणी स्पा सेंटर सुरू आहेत. शहरातील स्पा सेंटर चालकांकडे आवश्यक त्या परवानग्या तर नाहीच शिवाय काही ठिकाणी खास सेवा देण्याच्या बहाण्याने स्पाच्या नावाखाली बंद दरवाजा आड अनैतिक व्यवसाय केला जात होता. महा पोलीस न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित करीत त्याचा पाठपुरावा सुरू केला होता.
नयनतारा मॉलमध्ये सुरू होता व्यवसाय
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, जळगाव शहरातील गोविदा रिक्षा स्टॉप जवळ जळगाव जवळील नयनतारा आर्केड मॉल ०३ डे स्पा सेंटर शॉप नं.४०८ येथे स्पा सेंटरच्या आड गिऱ्हाईकांना शरीरसंबंधासाठी स्पा मसाज करणाऱ्या महीला करवी वेश्या व्यवसाय करण्यात येत आहे. मसाज पार्लर हे जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत असल्याने, सदरबाबतीत जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना कळवुन स्पा मसाज पार्लरवर बनावट ग्राहक पाठविण्यात आले होते. पोलिसांच्या कारवाईनंतर पिडीत मुलींना आशादीप वसतिगृहात रवाना करण्यात आले तर व्यवस्थापकाला अटक करण्यात आली. स्पा सेंटरचा मालक पुणे कारागृहात असल्याची माहिती तेव्हा समोर आली होती.
बी-टू-बी, हँड सर्व्हिसच्या नावाने गैरप्रकार
शहरात सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये विविध प्रकारच्या मसाज सेवा पुरवल्या जातात. प्रत्येक मसाजचे दर वेगवेगळे आहेत. काही स्पा सेंटरमध्ये सेवेचा दर दिल्यानंतर खोलीत मसाज करताना संबंधित तरुणीकडून वेगळ्याच सेवेचे आमिष दाखवले जाते. बी-टू-बी, शॉवर बाथ, हँड सर्व्हिसच्या नावाने गैरप्रकार देखील केले जातात. संबंधित स्पा मालकांना देखील याबाबत कल्पना असते. पोलिसांनी केलेल्या एका कारवाईमध्ये असाच प्रकार समोर आला होता. त्यामुळेच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
प्रभारी अधिकाऱ्यांना सुचना मात्र..
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आपल्या हद्दीत असलेल्या सर्व स्पा सेंटरची तपासणी करून कागदपत्रे व इतर परवानगी घेतली आहे की नाही? याची पडताळणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना तपासणी करून तसे कळवण्याचे अपर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले होते. मात्र आज जवळपास महिना झाला तरी काही ठोस पाऊले उचलण्यात आलेली नाही.
इतर स्पा सुरूच, तरुणाईला लागले वेड
जळगाव शहरात पोलिसांनी एका स्पा सेंटरवर कारवाई करीत गुन्हा दाखल केल्यानंतर इतर स्पा सेंटर मालकांचे धाबे दणाणले होते. दुसऱ्याच दिवशी स्पा सेंटर पुन्हा आपल्याच मिजाजमध्ये सुरु झाले. आजही अनेक सोशल मिडिया साईटवर अनधिकृत स्पा सेंटरच्या जाहिराती सुरु आहे. शहरातील तरुणाईसह तालुक्यातील देखील तरुण स्पा सेंटरकडे आकर्षित होत असून पुढील पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे. जळगाव पोलिसांच्या साथीला मनपाने देखील कागदपत्रे तपासणी मोहीम राबवली तर जवळपास सर्वच स्पा सेंटर बंद पडतील हे निश्चित आहे.