प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट! मित्रालाच दारू पाजून शेतात नेले; गळा आवळून केली निर्घृण हत्या
पत्नीशी अनैतिक संबंधांचा वाद ठरला जीवघेणा; मृतदेह शेतात टाकून फरार, रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडला खुनाचा थरार

प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट! मित्रालाच दारू पाजून शेतात नेले; गळा आवळून केली निर्घृण हत्या
पत्नीशी अनैतिक संबंधांचा वाद ठरला जीवघेणा; मृतदेह शेतात टाकून फरार, रावेर पोलिसांनी ४८ तासांत उलगडला खुनाचा थरार
रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात शेतात आढळलेल्या मजुराच्या मृत्यूचे गूढ रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडत खुनाचा पर्दाफाश केला आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून दोन मित्रांमध्ये निर्माण झालेल्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. दुसऱ्या संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व संशयित हे एकमेकांचे मित्र असून दोघेही मजुरीचे काम करत होते. काही महिन्यांपूर्वी संशयित क्रमांक एकाचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहात पकडल्यानंतर संशयिताला मारहाण करण्यात आली होती. त्याचाच राग मनात धरून मयताला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर मयताच्या पत्नीला तिच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेशातील माहेरी पाठविले होते.
तपासानुसार, ९ जुलैच्या रात्री संशयितांनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह शेतात टाकून पसार झाले. ११ जुलै रोजी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विविध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला.
या प्रकरणी शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संशयित मेघराज वसंत सांगळे (वय २९) याला अटक करण्यात आली असून, मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे (वय २७) याचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, रावेर पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करून खुनाचे गूढ उकलल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.






