कर्कश डीजे वाजविणाऱ्यावर कारवाई


कर्कश डीजे वाजविणाऱ्यावर कारवाई
चोपड्यात ११५.६ डेसिबल ध्वनी; डीजे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा, प्रतिनिधी : कायद्याचे तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करून मोठ्या व कर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्या चालकाविरुद्ध चोपडा शहर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.
जळगाव जिल्ह्यात सण, उत्सव, मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.
११५.६ डेसिबलची नोंद
६ सप्टेंबर रोजी चोपडा शहरात जहारवीर गोगाजी महाराज जन्मोत्सवाची मिरवणूक होती. यापूर्वी आयोजकांना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र मिरवणुकीदरम्यान रुपम ज्वेलर्स परिसरात मोहिणी डीजे बॅन्डचा चालक सचिन उर्फ पिंटू पंडीत शिरसाठ (३७, पंचशील नगर, चोपडा) हा मोठ्या आवाजात डीजे वाजविताना आढळला.
पोलिसांनी समज देऊनही डीजे सुरू ठेवल्याने पंचांसमक्ष ध्वनीची तपासणी करण्यात आली. यावेळी LEQ ११५.६, LAF Max १२०.९ आणि LAF Min ११३.० डेसिबल अशी नोंद झाली.
विविध कलमांन्वये कारवाई
याप्रकरणी सचिन उर्फ पिंटू शिरसाठ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २९२, ३(५), ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिनियम २००० चे कलम ३ व ४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली.
ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजे व साऊंड सिस्टीम चालकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.







