राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल
८४.४६ टक्के अधिक कामगिरी ; मोफत औषधोपचार व तज्ज्ञ सल्ल्यामुळे नवा आदर्श
जळगाव प्रतिनिधी I राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत जळगाव जिल्ह्याने मे २०२५ पर्यंतच्या कामगिरीत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. सरासरीपेक्षा तब्बल ८४.४६ टक्के अधिक कामगिरी करून जिल्ह्याने आरोग्य व्यवस्थापनात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या मोहिमेत निदान झालेल्या मुलांना मोफत औषधोपचार व तज्ज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी लक्ष्यापेक्षा जास्त कामगिरी केली असून, १३६ टक्क्यांपेक्षा अधिक मुलांचे परीक्षण करण्यात आले आहे. एकूण १ लाख ३८ हजार मुलांची तपासणी होऊन १३० टक्के लक्ष्यपूर्ती झाली आहे. त्याचबरोबर ४-डी तपासणी मोहिमेत ११ हजार ५७४ मुलांची वेळेवर ओळख व नोंदणी करण्यात आली. जटिल आजार असलेल्या मुलांना जिल्हा रुग्णालय तसेच उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत शालेय व आंगणवाडीतील ० ते १८ वयोगटातील बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीत जन्मजात विकृती, वाढीचे विकार, कुपोषण, अॅनिमिया, हृदयविकार, मेंदूविकार, श्रवणदोष, दृष्टीदोष, दंतविकार व त्वचारोग आदींचा शोध घेण्यात आला. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य व वर्तनविषयक समस्यांचीही तपासणी करण्यात आली.
विशेष म्हणजे, तपासणीत सात मुलांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. त्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून, एका मुलावर कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.
या यशस्वी कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याने राज्यात नवा आदर्श निर्माण करत राष्ट्रीय बाल आरोग्य मोहिमेला गती दिली आहे. नागरिक व तज्ज्ञांकडून या कार्याचे मोठे कौतुक होत आहे.






