निपाणे येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, आठ जणांवर गुन्हा दाखल

कासोदा, ता. एरंडोल : कासोदा पोलिसांनी निपाणे गावामध्ये एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
रात्री ११ वाजता पोलिसांना निपाणे येथील ग्रामपंचायतीजवळच्या मंगल कार्यालयाच्या आडोशाला काही लोक जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कारवाई केली.
या कारवाईत कैलास तुकाराम पाटील, प्रमोद शालिक महाजन, गोपीचंद नाना पाटील, वाल्मीक बाळकृष्ण बियाणी, मनोज नारायण पाटील, संभाजी दरवेश पाटील, दीपक लक्ष्मण माळी, सुरेश लक्ष्मण भील या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. विजय माणिक पाटील नावाचा एक आरोपी मात्र पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला.
पोलिसांनी आरोपींकडून रोख २,७०० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे यांच्या फिर्यादीनुसार, या सर्व आरोपींवर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे आणि नीलेश गायकवाड यांच्या पथकाने केली.