बेशिस्त कारचालकामुळे भडगाव बसस्थानकासमोर तासभर वाहतूक ठप्प!

बेशिस्त कारचालकामुळे भडगाव बसस्थानकासमोर तासभर वाहतूक ठप्प!
नागरिकांचा संताप; कारचालकावर दंडात्मक कारवाई
भडगाव प्रतिनिधी – शहरातील बसस्थानकासमोर आज सकाळी एका ब्रीझा कारचालकाच्या बेफिकीर वर्तनामुळे तब्बल तासभर वाहतूक कोंडी झाली. सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास या कारचालकाने महामार्गाच्या मधोमधच वाहन उभे करून तो तेथून निघून गेल्याने बसस्थानकातून निघणाऱ्या तसेच येणाऱ्या एसटी बसेस, खासगी वाहने आणि दुचाकी यांची मोठी गर्दी झाली. परिणामी संपूर्ण रस्ता ठप्प झाला आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
दरम्यान, दिवाळीनिमित्त बाहेरगावहून आलेले नागरिक आणि शुक्रवारचा बाजार असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अशा वेळी मधोमध उभी केलेली कार नागरिकांच्या हालअपेष्टा वाढविणारी ठरली. वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने बसस्थानक परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
सुमारे तासभरानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कार ताब्यात घेतली. संबंधित ब्रीझा कारचालकावर दंडात्मक कारवाई करून त्याला यापुढे असा प्रकार केल्यास कठोर शिक्षात्मक कारवाई केली जाईल, अशी कडक ताकीद पोलिसांनी दिली.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये पोलिस प्रशासनाने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि शहरात पार्किंग व्यवस्थेची तातडीने सुधारणा करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.





