भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी भारताची प्राचीन ग्रंथसंपदा उपयुक्त ठरेल – प्रा. प्रशांत पोळ
विद्यापीठात शिक्षकांसाठी एकदिवसीय भारतीय ज्ञान परंपरा दिशादर्शन कार्यशाळा

जळगाव (प्रतिनिधी) –भारतीय ज्ञान परंपरेला अडीच हजार वर्षाचा समृध्द वारसा असून भारताला विश्वगुरु बनविण्यासाठी भारताची प्राचीन ग्रंथसंपदा उपयुक्त होवू शकते, भारतातील अनेक प्राचीन ग्रंथातील ज्ञानसंपदेवर प्रयोग करून पडताळणी केली पाहिजे, ते आपल्याला प्रासंगिक वाटतील असे प्रतिपादन दिल्ली वेब भारती संस्थेचे सल्लागार साहित्यिक व चिंतक प्रा. प्रशांत पोळ यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला व मानव विद्या प्रशाळा आणि भारतीय मानव्य प्राच्यविद्या अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19 सप्टेंबर रोजी भारतीय ज्ञान परंपरा (IKS) या विषयावर विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात शिक्षकांसाठी एकदिवसीय भारतीय ज्ञान परंपरा दिशादर्शन कार्यशाळेत बीजभाषण करतांना केले.
यावेळी मंचावर कुलगुरु प्रा.व्ही.एल माहेश्वरी, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रशाळेचे संचालक प्रा. रामचंद्र भावसार उपस्थित होते.
प्रा. पोळ पुढे म्हणाले की, भारत समृध्द व ज्ञानवंत देश व्हावा. मात्र भारताच्या प्राचीन ग्रंथ सामुग्रीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेली नाही, भारतीय ज्ञानपरंपरेचे प्रमुख तीन उद्देश त्यांनी सांगितले. त्यात भारताचा स्वर्णीम इतिहास जनमाणसांपर्यंत पोहचवावा, या समृध्द इतिहासाचे श्रेय तत्कालिन महापुरुषांना मिळावे कारण ज्याचा फायदा इतर देशांनी घेतला आहे. इतिहासातील शोध व ग्रंथ आजही प्रासंगिक आहेत. याबाबत प्रा. प्रशांत पोळ यांनी प्राचीन काळातील विविध शोध व ग्रंथाची माहिती दिली. त्यांनी प्रकाशाच्या वेगाची गणना करणारा ऋग्वेदातील उल्लेख याचा दाखला दिला.
परमार वंशाचे राजा समरांगण सूत्रधार यांनी लिहिलेला वास्तुकला व नगररचेनेवर आधारित ग्रंथ, जल व्यवस्थापनावर लिहिलेला ग्रंथ व या ग्रंथावर अधारीत झालेल्या संशोधनाच्या यशस्वीततेचा संदर्भ त्यांनी दिला. तसेच जमीन, वारा, अग्नी, वायू आणि जल या पंचमहाभूतांचा अभ्यास केला तर निसर्गाची रचना लक्षात येवू शकते. पराशर ऋषी यांच्या हवामान अंदाजा संदर्भातील ग्रंथाची माहिती व त्याची पडताळणी संदर्भात माहिती दिली. तसेच नोबेल पारितोषिक विजेते जगदिशचंद्र बोस यांनी लावलेला वनस्पती जीवा संदर्भातील माहिती त्यांनी दिली. स्थितीस्थापकता सिद्धांताचा ग्रंथात उल्लेख आणि महर्षी बोधारींनी जे सूत्र लिहिले ते पायथागोरस यांनी जसेच्या तसे मांडले असल्याची माहिती त्यांनी दिली. वराह मीर यांची प्राचीन वास्तुकला आणि चीन बोधिधर्मण यांचे खेळाविषयी योगदान याचा त्यांनी संदर्भ दिला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे बहुआयामी असून त्यातील एक महत्वाचा घटक म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा. ही परंपरा अगोदर शिक्षक आणि शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी म्हणून आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. भारतीय विज्ञान, योग, तत्त्वज्ञान या सर्व गोष्टी पुराव्यासह जगापुढे मांडल्याने भारतीय ज्ञानाची प्रगल्भता अधोरेखित होते. भारतीय ज्ञान परंपरा बद्दल जे चुकीचे समज होते ते या कार्यशाळेमुळे दूर झाले असून आता शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करण्याची गरज आहे, असे त्यांनी आवाहन केले.
प्रास्ताविक करते वेळी व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी या कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली. भारताला जागतिक ज्ञान, महासत्ता बनविण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाचा निश्चित उपयोग होईल असे मत मांडले. सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन यांनी केले तर आभार प्रा. राम भावसार यांनी मानले.
तत्पूर्वी सकाळी १० वाजता कला व मानव्य विद्या प्रशाळेतील भारतीय परंपरा व ज्ञान प्राच्यविद्या अध्ययन कक्षाचे उद्घाटन प्रा. प्रशांत पोळ यांच्या हस्ते तुळशी वृंदावनास जल समर्पित व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. प्रा.व्ही. एल. माहेश्वरी, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्र-कुलगुरु प्रा. एस टी. इंगळे, व्य.प. सदस्य ॲङ अमोल पाटील, पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिष्ठाता वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा प्रा.अनिल डोंगरे, प्रशाळेचे संचालक प्रा. रामचंद्र भावसार, डॉ. तुषार रायसिंग, डॉ. सुचित्रा लोंढे उपस्थित होते.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात साहित्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गौरवशाली परंपरा या विषयावर भाष्य करतांना प्रा. प्रशांत पोळ यांनी पौराणिक काळातील भारतीय ज्ञानाची महती विशद केली. देशाच्या महाशक्तीसत्तेसाठी आत्मविश्वास असलेली पिढी निर्माण झाली पाहिजे त्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा आवश्यक आहे. ज्ञानभंडारामुळे आत्मविश्वास भारत निर्माण होईल असा आशावाद प्रा. पोळ यांनी व्यक्त केला.
शेवटच्या सत्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समितीचे सदस्य तथा कार्यशाळेचे चर्चा प्रवर्तक डॉ. भरतदादा अमळकर यांच्या उपस्थितीत खुले चर्चासत्र झाले. सूत्रसंचालन डॉ. वीणा महाजन यांनी केले तर समारोप सत्राचे आभार डॉ. तुषार रायसिंग यांनी मानले. या प्रसंगी शिक्षणतज्ञ प्राचार्य अनिल राव, प्रा.प्रकाश पाठक, अधिसभा सदस्य नेहा जोशी, स्वप्नाली महाजन-काळे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. कार्यशाळेला २२० शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यशाळेच्या समारोपानंतर सहभागींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.






