CrimeDetection

पहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बैलजोडी चोरीप्रकरणी चार जणांना अटक

पहूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बैलजोडी चोरीप्रकरणी चार जणांना अटक

पिंपळगाव गोलाईत येथील चोरीचा गुन्हा उघड; बैलजोडी व टेम्पोसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव, प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत शिवारातून चोरीला गेलेली बैलजोडी हस्तगत करत पहूर पोलिसांनी गुरे चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेली बैलजोडी आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण २ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पहूर पोलिसांच्या या कारवाईमुळे गुरे चोरीच्या प्रकरणाचा छडा लागला आहे.

५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पिंपळगाव गोलाईत शिवारातील गट क्रमांक १०७ मधून शेतकऱ्यांच्या मालकीची मावळी जातीची, पांढऱ्या रंगाची, सरळ व लांब शिंगे असलेली सात ते आठ वर्षे वयाची दोन बैल चोरीला गेली होती. या बैलांची किंमत एक लाख पाच हजार रुपये होती. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला.

तपासादरम्यान संजय प्रल्हाद पाटील आणि ज्ञानेश्वर गणपत पाटील, दोघेही रा. सोनाळा, ता. जामनेर, यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी दिनेश ऊर्फ टेलर जगन्नाथ पाटील आणि ईश्वर कडू पाटील यांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरी केलेली बैलजोडी सुनसगाव येथील पिंटू नावाच्या व्यापाऱ्याला विकल्याचेही तपासात समोर आले.

त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते आणि पथकाने सुनसगाव येथे जाऊन तपास केला. तेथे पिंटू ऊर्फ नरेंद्र प्रल्हाद गोखरे यांच्या शेतात चोरीला गेलेली बैलजोडी आढळून आली. पोलिसांनी बैलजोडी हस्तगत करून मूळ मालकाच्या ताब्यात दिली. चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी गोखरे यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

२ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

या कारवाईत एक लाख पाच हजार रुपये किमतीची दोन बैल आणि एक लाख ८० हजार रुपये किमतीचा निळ्या रंगाचा विनानंबरचा मालवाहू टेम्पो असा एकूण दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोलीस हवालदार दीपक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर कोकणे, सत्यवान कोळी, वैभव देशमुख आणि चालक पोलीस हवालदार हेमंत सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस हवालदार दीपक पाटील करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button