Crime

यावलमध्ये धक्कादायक प्रकार; साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, पती व सासूविरुद्ध खूनाचा गुन्हा

यावलमध्ये धक्कादायक प्रकार; साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, पती व सासूविरुद्ध खूनाचा गुन्हा

अपघाताचा संशय दूर; पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर आईच्या तक्रारीवरून खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

यावल | प्रतिनिधी

यावल तालुक्यातील किनगाव येथे सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या घटनेला पोलिसांच्या सखोल तपासानंतर गंभीर वळण लागले आहे. विहिरीत पडून साडेतीन वर्षीय मुलाचा मृत्यू आणि त्याच्या आईच्या जखमी होण्याच्या प्रकरणात आईच्या तक्रारीवरून तिच्या पती व सासूविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत 27 वर्षीय महिला आणि तिचा साडेतीन वर्षीय मुलगा पडल्याची घटना घडली होती. या घटनेत मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर जखमी महिलेवर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे समोर आले होते. मात्र, मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी जखमी महिलेची सखोल चौकशी केली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 254/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 109(1) व 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी सरस्वती स्वप्निल पाटील (वय 27, रा. किनगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या सासूने त्यांना आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत विहिरीतील लाकडी संरचनेचा आधार मिळाल्याने फिर्यादीचा जीव वाचला, मात्र मुलाचा मृत्यू झाला. या प्रकारात पतीचाही सहभाग असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी सुमारे 70 टक्के दृष्टिदोषग्रस्त, तर तिचे पती पूर्णपणे दृष्टिहीन आहेत. मयत मुलगाही दृष्टिदोषग्रस्त होता. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणेदरम्यान बाळालाही दृष्टिदोष असल्याचे वैद्यकीय तपासणीत सांगण्यात आले होते. त्यानंतर गर्भपाताच्या मुद्द्यावरून कौटुंबिक वाद सुरू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी स्वप्निल भागवत पाटील (वय 34) आणि आशाबाई भागवत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, यावल पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button