मी देव नाही ,माणूस आहे चुका होऊ शकतात- नरेंद्र मोदी

पहिल्या पॉडकास्ट मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी उलगडला जीवन प्रवास
नवी दिल्ली वृत्तसंस्था Í देश प्रथम’ या आपल्या मूळ विचारसरणीत बसणारा प्रत्येक नवीन विचार आत्मसात करण्यास आणि जुने विचार त्यागण्यास आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. आपल्या पहिल्या पॉडकॉस्ट मुलाखतीमध्ये मोदींनी राजकीय व वैयक्तिक जीवनातील विविध गोष्टींबाबत बोलताना, आयुष्यात पुढे जाण्यासाठी जीवनात जोखीम घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच आपल्याकडून देखील चुका होतात. कारण मीदेखील माणूस आहे. देव नाही, असे ते महणाले.
झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी आपल्या पॉडकॉस्टमध्ये मुलाखतीसाठी मोदींना बोलावले होते. या पॉडकॉस्टचा पूर्ण व्हिडीओ शुक्रवारी जारी करण्यात आला. यात कामत यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना मोदींनी जगभरातील युद्धाची स्थिती, राजकारणामधील युवकांची भूमिका, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळावर भाष्य करताना व्यक्तिगत जीवनातील लहानपणीच्या एखाद्या मित्राच्या संपर्कात आहात का? या प्रश्नाचे उत्तर देताना मोदींनी हे प्रकरण आपल्यासाठी थोडेसे वेगळे असल्याचे म्हटले. कारण खूप लहान वयात मी घर सोडले होते.
त्यामुळे प्रदीर्घ काळ मी कोणाच्या संपर्कात नव्हतो. आपले जीवन असेच एकटे भटकण्यात गेल्याचे ते म्हणाले, पण मुख्यमंत्री झाल्यावर माझ्या मनात काही इच्छा होत्या. यापैकी एक इच्छा म्हणजे जुन्या मित्राना बोलावण्याची होती. मुख्यमंत्री झाल्यावर मी मित्र, शिक्षक व कुटुंबातील काही सदस्यांना बोलावले होते. जवळपास ३० ते ३५ लोक जमले होते. रात्रभर गप्या मारत जुन्या आठवणी जागवल्या. पण मला आनंद वाटला नाही. कारण मी मित्र शोधत होतो; पण त्यांना मुख्यमंत्री दिसत होता, अरे म्हणून बोलणारा कोणीही राहिला नव्हता, असे मोदी म्हणाले.