रावेर पोलिसांचा धाडसी पाठलाग; दरोड्याचा कट उधळला
तलवार, टॉमी, मिरचीपूड, बनावट नोटा व इको कार जप्त; दोन जण ताब्यात, तिघांचा शोध सुरू

रावेर पोलिसांचा धाडसी पाठलाग; दरोड्याचा कट उधळला
तलवार, टॉमी, मिरचीपूड, बनावट नोटा व इको कार जप्त; दोन जण ताब्यात, तिघांचा शोध सुरू
रावेर | प्रतिनिधी
रावेर शहरात गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या संशयितांच्या टोळीचा रावेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत कट उधळून लावला. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तलवार, टॉमी, मिरचीपूड, दोरखंड, बनावट नोटा आणि इको कारसह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अंधाराचा आणि शेतशिवाराचा फायदा घेत तिघेजण पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
गुप्त माहितीवरून रचला सापळा
९ जुलै रोजी पाल दुरक्षेत्र येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण यांना पाल गावातून एक संशयास्पद मारुती सुझुकी इको कार भरधाव वेगाने रावेरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने रवाना करत दोन्ही बाजूंनी नाकाबंदीचे नियोजन केले.
भरधाव पाठलाग; चिखलात अडकली कार
आभोडा गावाजवळ पोलिसांनी संशयित वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढला. रावेर शहरातील आठवडे बाजार परिसरातून बऱ्हाणपूर रस्त्यावरील शेताकडे जात असताना वाहन चिखलात अडकल्याने संशयितांचा डाव फसला. त्यानंतर पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी धाडसी पाठलाग केला. तिघे संशयित शेतातून पसार झाले, तर दोघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांना सुरक्षित ताब्यात घेऊन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वाहनातून शस्त्रसाठा आणि बनावट नोटा जप्त
इको कारची तपासणी केली असता त्यामधून लोखंडी तलवार, टॉमी, पेंचिस, लाल मिरचीपूड, दोरखंड, सुमारे तीन लाख रुपये दर्शनी मूल्याच्या ‘चिल्ड्रन बँक’च्या बनावट नोटा, तसेच एमएच-१९-ईए-२४०३ क्रमांकाची मारुती सुझुकी इको कार जप्त करण्यात आली. प्राथमिक तपासात संशयित गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या कारवाईत निखिल प्रविण पाटील (वय २०) आणि अल्ताफ जलाल शेख (वय २६, दोघे रा. साईनगर, घोडबंदर रोड, कासार वडवली, जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर मेहरबान जहांगीर तडवी (रा. पाल) याच्यासह अन्य दोन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या टोळीचा इतर गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, तसेच ते कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या उद्देशाने गुन्हा करण्याच्या तयारीत होते, याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण तसेच रावेर गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.





